अमरावती: 19 फेब्रुवारीला संपूर्ण भारतभरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. शिवरायांची जिवंत स्मारकं असं गड-किल्ल्यांना मानलं जातं. याच गड-किल्ल्यांच्या संवर्धनाचं मोठं काम अमरावतीतील चांदुर बाजार येथे असणारी स्वराज्य सेवा प्रतिष्ठान ही संस्था गेल्या कित्येक वर्षांपासून करत आहे. तसेच शिवकालीन शस्त्रास्त्रे गोळा करून त्यांच्या जतन व संवर्धनाचं काम देखील केलं जातंय. याबाबत स्वराज्य सेवा प्रतिष्ठानचे प्रमुख शिवा काळे यांनी लोकल18 सोबत बोलताना माहिती दिलीये.
advertisement
काळे सांगतात की, “स्वराज्य सेवा प्रतिष्ठान हे मुख्यतः गड किल्ले संवर्धनासाठी काम करते. त्याचबरोबर ऐतिहासिक वास्तूंची ओळख नवीन पिढीला व्हावी, यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. तेच काम करत असताना असे आढळून आले की, विदर्भातील विविध जिल्ह्यांत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात वापरली जाणारी शस्त्र आहेत. ती शस्त्र लोकांनी सहज घरी ठेवलेली होती. त्या शस्त्रांबाबत नवीन पिढीला माहिती मिळावी आणि महाराजांचा ऐतिहासिक वारसा जपला जावा, या उद्देशाने विदर्भातील शिवकालीन शस्त्रांचा संग्रह आम्ही केलेला आहे.”
Shiv Jayanti: चक्क मोहरीवर साकारले छत्रपती! नाशिकच्या तरुणीची अशीही शिवभक्ती, जागतिक विक्रम!
“सध्या आमच्याकडे 150 ते 200 शस्त्रांचा संग्रह आहे. त्या शस्त्रांचे विविध ठिकाणी स्वराज्य सेवा प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित केले जाते. त्याला ‘इतिहासाचे मुक साक्षीदार, विदर्भाचे शस्त्रागार’ असे नाव दिले आहे. आता मात्र, त्यात बदल करून ‘इतिहासाचे बोलके साक्षीदार, विदर्भाचे शस्त्रागार’ असे नाव या शिवजयंतीला आम्ही देणार आहोत, अशी माहितीही शिवा यांनी दिली.
कोणकोणती शस्त्रं आहेत?
स्वराज्य संस्थेकडे दोन प्रकारच्या धोप, दांडपट्टा, पट्टा, वाघ नखे, बिन्नोड, तोफ गोळे, फरश्या, गोफण, बिचवा, कट्यार, बाण या सर्व शस्त्रांचा संग्रह आहे. या सर्व शस्त्रांचे वेगवेगळे महत्त्व आहे. शस्त्रांविषयी माहिती सांगताना एका फोटोवरून शिवा सांगतात की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या उजव्या हातातील तलवार ही मराठा धोप आहे. त्याचबरोबर त्यांचं डाव्या हातातील शस्त्र हा पट्टा आहे. त्यालाच दांडपट्टा म्हणूनही ओळखले जाते. महाराजांच्या दांडपट्टाच नाव हे यशवंत होतं. कांचन बरीच्या लढाईत दोन्ही हातात दोन पट्टे चढवून महाराजांनी लढाई केल्याची नोंद इतिहासात आहे. त्यानंतर महाराजांचं तिसरं शस्त्र म्हणजे कट्यार, अशी ही 3 शस्त्रं महाराजांच्या फोटोमध्ये दिसून येतात.
छत्रपती संभाजी महाराजांच्या उभ्या फोटोमध्ये सुद्धा आपल्याला तीन शस्त्रं बघायला मिळतात. त्यांच्या कमरेला असलेली तलवार म्हणजे वक्रधोप आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातात असलेली धोप ही सरळ मराठा धोप आहे. त्याचबरोबर इतरही काही शस्त्रांचे वेगवेगळे महत्त्व आहेत, असे शिवा काळे सांगतात.