उष्णता वाढली तरी पावसाचा धोका कायम
तामिळनाडू, केरळ आणि दक्षिण भारतात 25 ते 28 ऑक्टोबर दरम्यान अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या भागात रेड आणि यलो अलर्ट देण्यात आला आहे. या सगळ्याचा परिणाम महाराष्ट्रातील हवामानावर होणार आहे. महाराष्ट्रात दिवसा उष्णता वाढणार असून दुपारनंतर मुसळधार पाऊस राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील तळ कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही पट्ट्यात पाऊस राहणार आहे.
advertisement
अरबी समुद्रात वारं फिरलं
अरबी समुद्रात डिप्रेशन जे आहे ते उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे. मात्र त्याचं वादळात रुपांतर अजून झालेलं नाही. मात्र पुढचे 24 तास महत्त्वाचे ठरतील. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा डिप्रेशनमध्ये कन्वर्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दक्षिण पश्चिम दिशेकडून वादळ येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चक्रीवादळाचं संकट दक्षिणेकडून येत आहे.
महाराष्ट्रात तळ कोकण, मध्य महाराष्ट्रात मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उर्वरित महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस राहील. हा अवकाळी पाऊस असला तरीसुद्धा पाऊस पडून गेल्यावर उष्णता जास्त जाणवत आहे. त्यामुळे पाऊस पडण्याआधी आणि पडून गेल्यावर घामाच्या धारा जास्त वाहात आहेत. २५ ते २८ ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्रात मुसळधार पाऊस राहणार आहे.
मच्छिमारांसाठी देखील अलर्ट
29 ते 30 ऑक्टोबर दरम्यान पाऊस महाराष्ट्रातून जाण्याची शक्यता आहे. असा प्राथमिक अंदाज असला तरीसुद्धा जर वादळ आलं तर मात्र ऑक्टोबर अखेर आणि नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा पाऊस राहण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसामुळे शेतीचं अतोनात नुकसान होत आहे. वादळ आणि पावसाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. मच्छिमारांसाठी देखील खोल समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे.
पुढचे पाच दिवस धोक्याचे
राज्यातील अनेक भागात गुरुवारपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली. राज्यात पुढील तीन - चार दिवस अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या कालावधीत काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात पावसाचा अंदाज आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार बुलडाणा जिल्ह्यातही पावसाची रिपरिप पाहायला मिळाली. खामगाव,नांदुरा शेगाव तालुक्यात पाऊस झाला आहे.
महाराष्ट्रात सध्या काय स्थिती?
पावसामुळे पिकांना धोका निर्माण झाला आहे. मनमाड शहर आणि ग्रामीण भागात जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. मनमाड पाठोपाठ चांदवडला देखील दमदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. या पावसाचा फटका कांदा आणि मक्याला बसणार असल्यामुळे शेतकरी टेन्शनमध्ये आला आहे. नांदेड शहरात जोरदार पाऊस झालाय.. शहरासह जिल्हयात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली असुन येत्या 28 तारखेपर्यंत हवामान खात्याने नांदेड जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. मुंबईसह राज्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली. हवामान विभागाकडून पुढचे पाच दिवस राज्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
