राज्यामध्ये नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राजकीय नेत्यांच्या पक्षांतराच्या उड्या सुरू झाल्या आहेत. स्थानिक समीकरणे आणि भविष्यातील राजकीय गणिते लक्षात घेऊन नेते मंडळी या पक्षातून त्या पक्षात जात आहेत. गुजराती यांची ओळख शरद पवार यांचे अतिशय निकटवर्तीय अशी आहे. पवार यांनी गुजरातींना थेट विधानसभेच्या अध्यक्षपदाची संधी देखील दिली होती. राष्ट्रवादीच्या चांगल्या वाईट काळात गुजराती यांनी शरद पवार यांना साथ दिली. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या आधी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
advertisement
शरद पवार यांची साथ सोडताना काय म्हणाले अरुण गुजराती?
शरद पवार साहेबांसोबत आनंदाचा काळ गेला. ज्यांनी मला मोठे केले ते शरद पवार, ज्यांनी मला पुढे आणले ते माझे कार्यकर्ते, दोन्हींमध्ये माझे सँडविच झाले होते. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी अजित पवार यांच्यासोबत जावे असा कार्यकर्त्यांचा आग्रह होता. त्यांच्या आग्रहास्तव मी अजित पवार यांच्यासोबत जात असल्याचे स्पष्टीकरण अरुण गुजराती यांनी दिले.
तुम्ही निर्णय घ्या, नाहीतर आम्हाला आमचा मार्ग मोकळा, कार्यकर्त्यांचा दबाव
अरुण भाई गुजराती हे 40 वर्ष शरद पवार यांच्यासोबत राहिले. त्यानंतर राष्ट्रवादी पक्षात दोन गट झाल्याच्या काळात गुजराती यांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी पक्ष सोडून जात होते. अर्धे कार्यकर्ते भाजपमध्ये गेले तर अर्धे इतर पक्षात गेले. उरलेल्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा आग्रह धरला. अजित पवार यांच्यासोबत गेले तर तुमच्यासोबत राहू नाहीतर आम्हाला आमचा मार्ग मोकळा आहे, असे कार्यकर्त्यांनी सांगितल्यानंतर अरुण गुजराती यांना अखेर निर्णय घ्यावा लागला.
चोपड्यात अरुण भाई गुजराती यांच्या रुपाने राष्ट्रवादीचे वर्चस्व होते. पण पक्षात फूट पडल्यानंतर कार्यकर्त्यांच्या कोलांटउड्यांनी शरद पवार यांच्या पक्षाची ताकद कमी झाली. आता गुजराती अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत जात असल्याने चोपड्यात त्यांची ताकद वाढेल.
