संगीतकार आर.डी. बर्मन यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र भूषण आणि ज्येष्ठ गायिका आशा भोसले आर. डी. बर्मन यांच्या निवासस्थानी अभिवादन करण्यासाठी दाखल झाल्या. यावेळी त्यांच्या सोबत राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार देखील होते. यावेळी माध्यमांनी आशा भोसले यांना उद्धव आणि राज या ठाकरे बंधू मोर्चात एकत्र येणार असल्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर आशा भोसले यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
advertisement
ठाकरे कुटुंब आणि मंगेशकर कुटुंबीय यांचे अनेक दशकांपासून कौटुंबिक संबंध आहेत. काही महिन्यांपूर्वीच मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने मनसेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात आशा भोसले यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी राज ठाकरे यांचे कौतुक केले होते. मात्र, आशा भोसले यांच्या वक्तव्याने आता अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
आशा भोसले काय म्हणाल्या?
उद्धव आणि राज ठाकरे हे पहिल्यांदाच अनेक वर्षानंतर राजकीय आंदोलनात एकत्र दिसणार आहेत. ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीची ही नांदी असल्याचे म्हटले जात आहे. आशा भोसले यांना माध्यमांनी ठाकरे बंधू एकत्र येण्यावर प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना आशा भोसले यांनी म्हटले की, मी राजकारणात फक्त आशिष शेलार यांना ओळखते. इतर कोणत्याही राजकारण्याला मी ओळखत नाही, असं वक्तव्य आशा भोसले यांनी केले. आशा भोसले यांनी ठाकरे कुटुंबाशी अनेक दशके असलेल्या संबंधानंतरही असे वक्तव्य केल्याने चर्चांना उधाण आले आहे.
पहिलीपासून तीन भाषा आणि त्यातही हिंदी शिकवण्याच्या मुद्यावर आशा भोसले यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला. आपण राजकारणावर बोलणार नसल्याचे त्यांनी सांगितले.