आंदेकर कुटुंबाकडे पैसा आहे आणि आताचे लोक पैशाला भुलतात. राष्ट्रवादी काँग्रेसने आंदेकरांना सांभाळून घेतले, त्यांना आसरा दिला म्हणूनच त्यांनी त्यांचे हातपाय पसरले, त्यांची हिम्मत वाढली, असा गंभीर आरोप हत्या झालेल्या आयुष कोमकर याची आई कल्याणी कोमकर यांनी केला. हाच प्रश्न पुण्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारण्यात आला.
advertisement
आंदेकरांची गुन्हेगारी म्हणजे विकृती-अजित पवार
आंदेकर आणि राष्ट्रवादीच्या संबंधांवर विचारले असता अजित पवार पत्रकारांवर काहीसे चिडलेले पाहायला मिळाले. "याआधी आंदेकर कुटुंबाचा काँग्रेसशी संबंध होता. आंदेकर हे आमचेही नगरसेवक होते. उद्या तू ही (पत्रकार) पक्ष काढला तर पक्षातील कुणी सदस्याने अशा गोष्टी कराव्यात, असे तुला वाटेल का? पक्षात अशी विकृती असावी असे कोणत्याच अध्यक्षाला, पदाधिकाऱ्याला वाटत नाही. कुणीच अशा गोष्टींचे समर्थन करणार नाही. आपण नेहमी शिव शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो त्यावेळी त्या विचारधारेने पुढे जाण्याचा प्रयत्न आपल्या सगळ्यांचा असतो", असे अजित पवार म्हणाले.
राष्ट्रवादीने सांभाळून घेतले म्हणून त्यांचे धाडस वाढले, कल्याणी कोमकरांच्या आरोपांवर अजितदादा म्हणाले...
राष्ट्रवादीने सांभाळून घेतले म्हणून त्यांचे धाडस वाढले, या कल्याणी कोमकर यांच्या आरोपांवर अजित पवार म्हणाले, गणेशोत्सव काळातील घटनेनंतर मी पोलीस दलातील प्रमुख अधिकाऱ्यांशी बैठक घेतली आहे. सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय, या प्रकरणात जे जे दोषी असतील त्यांच्यावर कायद्याने जी कारवाई करणे गरजेचे आहे, ती कारवाई केली जाईल. पोलिसांनी या प्रकरणातील काही आरोपींना अटक केली आहे. काही आरोपींना अटक करणे बाकी आहे. पोलिसांनी कोणताही राजकीय दबाव न सहन करता कडक कारवाई करावी. कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याचा दबाव न घेता पोलिसांनी पारदर्शक तपास करून आवश्यक ती कठोर कारवाई करावी, असे अजित पवार म्हणाले.
आंदेकर टोळीवर मकोका लावण्याचे आदेश
आंदेकर प्रकरणातील काहींवर मकोका लावण्याच्या सूचना मुख्यमंत्री स्तरावरून आणि आमच्या स्तरावरून आम्ही दिलेल्या आहेत. पोलीस त्यांचे काम करीत आहेत. कठोर पावले उचलत आहेत. शेवटी शहर शांत राहिले पाहिजे, ही भूमिका सगळ्यांचीच आहे, असेही ते म्हणाले.