दुर्वास दर्शन पाटील असं अटक केलेल्या २५ वर्षीय आरोपीचं नाव आहे. आरोपी दुर्वास हा एका बार मालकाचा मुलगा आहे. तर भक्ती मयेकर असं हत्या झालेल्या २६ वर्षीय तरुणीचं नाव आहे. आरोपी दुर्वास याने प्रेम प्रकरणातून भक्तीची हत्या केली. यानंतर तिचा मृतदेह संगमेश्वर तालुक्यातील आंबा घाटात फेकून दिला. पोलिसांनी आता मृतदेह ताब्यात घेतला असून आरोपीलाही बेड्या ठोकल्या आहेत.
advertisement
नेमकं प्रकरण काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून भक्ती घरातून बेपत्ता होती. कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध घेतला पण तिचा काहीच थांगपत्ता लागला नाही. यानंतर भक्तीच्या कुटुंबीयांनी दुर्वास पाटील याच्यावर संशय व्यक्त केला. त्यानेच आपल्या मुलीला गायब केल्याचा आरोप त्यांनी केला. यानुसार, पोलिसांनी दुर्वासला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरं दिली. पण पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
हत्येनंतर तिचा मृतदेह आंबाघाटात फेकून दिल्याचेही त्याने सांगितले. या गंभीर घटनेची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी आणि शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी तातडीने पोलीस पथकासह आंबाघाटात धाव घेतली. तिथे तिचा मृतदेह आढळून आला. आरोपीनं प्रेम प्रकरणातून किरकोळ वाद झाल्यानंतर भक्तीची हत्या केली आणि तिचा मृतदेह आंबाघाटात फेकल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. पोलीस घटनेचा सविस्तर तपास करत आहेत.