माळेगाव कारखान्याच्या सत्तेसाठी चार पॅनेल्समध्ये जोरदार चुरस असणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तळ ठोकून या निवडणुकीत प्रचार केला. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली निळकंठेश्वर पॅनेल, शरद पवार आणि युगेंद्र पवार यांचं नेतृत्व असलेले बळीराजा बचाव पॅनेल, शरद पवारांचे माजी सहकारी चंद्रराव तावरे यांचं नेतृत्वातील सहकार बचाव पॅनेल यांच्यात चुरस आहे. या निवडणुकीत एकूण 19 हजारांहून अधिक मतदार असून, 88.48 टक्के मतदान झालं आहे. कारखान्याच्या संचालक मंडळासाठी 90 उमेदवार रिंगणात असून, मतदार आज एकूण 21 संचालकांची निवड करणार आहेत.
advertisement
अजित पवारांचे तावरेंना आव्हान, युगेंद्र पवाराचं आव्हान नाही?
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निळकंठेश्वर पॅनेलने पहिल्या फेरीत ‘ब वर्ग’ गटातून दणदणीत विजय मिळवला असला, तरी उर्वरित उमेदवारांसाठी वातावरणात अनिश्चिततेचं सावट आहे. सध्या सुरू असलेल्या मतपत्रिका छाननीनंतर मतमोजणी प्रक्रिया पूर्णत्वाकडे जात असून, आतापर्यंतच्या कलानुसार मुख्य लढत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनेल आणि चंद्रराव तावरे यांच्या सहकार बचाव पॅनेलमध्ये असल्याचं चित्र स्पष्ट होत असल्याची माहिती समोर आली आहे.
क्रॉस व्होटिंगने उमेदवारांची धाकधूक वाढवली...
‘ब वर्ग’ गटातील विजयाने अजित पवारांनी पहिल्याच फेरीत जोरदार ताकद दाखवली आहे. एकूण 102 मतांपैकी 91 मते मिळवत त्यांनी निर्णायक आघाडी घेतली. मात्र, पणदरे, सांगवी, आणि माळेगाव या मतदार संघांमध्ये मोठ्या प्रमाणावर क्रॉस वोटिंग झाल्याचे संकेत मिळत आहेत, त्यामुळे बाकीच्या उमेदवारांच्या निकालाबाबत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सध्या छाननी प्रक्रियेदरम्यान मतपत्रिकांमधून दिसत असलेला कल क्रॉस वोटिंगचा असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. अनेक उमेदवारांनी ‘पॅनेल टू पॅनेल’ मतदान व्हावं, असं आवाहन केलं होतं, विशेषतः अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना कटाक्षाने पॅनेलनिष्ठ राहण्याचा आदेश दिला होता. मात्र प्रत्यक्षात मतदारांनी वेगवेगळ्या पॅनेलमधून उमेदवार निवडल्याचे आढळून येत आहे.
ही क्रॉस वोटिंग नेमकी कुणाच्या पारड्यात जाते आणि कुणाच्या पायाखालची वाळू सरकवते, हे आगामी निकालातून स्पष्ट होणार आहे. त्यामुळे मतमोजणीच्या पुढच्या फेऱ्यांकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
अजितदादांचे तावरेंना आव्हान...
तावरे यांनी याआधी साखर कारखान्याचे अध्यक्षपद भूषवलं आहे. तावरे हे भाजपचे स्थानिक नेते आहेत. तर, दुसरीकडे अजित पवार यांनी आपल्या पॅनेलची सत्ता आल्यास आपणच अध्यक्षपदी असणार असल्याचे जाहीर केले. त्याशिवाय, त्यांनी विविध आश्वासने दिली.