राज्यातील लक्ष वेधून घेणाऱ्या आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी काल (२४ जून) सकाळी 9 वाजता सुरू झाली. मध्यरात्री दीड वाजेपर्यंत पहिल्या फेरीचे मतदान पूर्ण झाले असून, आज (25 जून) दुपारी 12 ते 1 वाजेदरम्यान संपूर्ण निकाल स्पष्ट होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यशवंत माने यांनी दिली.
advertisement
दादांचा जोर की तावरे मुसंडी मारणार?
या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील नीलकंठेश्वर पॅनलला स्पष्ट आघाडी मिळताना दिसत आहे. या पॅनलचे तब्बल 16 उमेदवार आघाडीवर आहेत. तर, प्रतिस्पर्धी चंद्रराव तावरे यांच्या सहकार बचाव पॅनलचे 4 उमेदवार सध्या आघाडीवर आहेत.
कोणते उमेदवार आघाडीवर?
सांगवी गटात चुरशीची लढत पहायला मिळत असून, माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे आणि रणजीत खलाटे हे दोघे आघाडीवर आहेत. बारामती गटामध्ये अजित पवार गटाचे देविदास गावडे आणि तावरे गटाचे जी. बी. गावडे यांची आघाडी असून, नितीन सातव पिछाडीवर आहेत.
महिला प्रतिनिधीत्वाच्या गटातही लक्षवेधी स्थिती आहे. अजित पवार गटाच्या संगीता कोकरे आणि सहकार बचाव पॅनलच्या राजश्री कोकरे दोघीही आपापल्या मतदारसंघात आघाडीवर आहेत.
दरम्यान, दुसऱ्या फेरीची मतमोजणी पहाटे 5 वाजता सुरू झाली आहे. त्यामुळे अखेरचा निकाल जाहीर होईपर्यंत मतदारांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता कायम आहे.
‘ब वर्ग’ गटातील विजयाने अजित पवारांनी पहिल्याच फेरीत जोरदार ताकद दाखवली आहे. एकूण 102 मतांपैकी 91 मते मिळवत त्यांनी निर्णायक आघाडी घेतली. मात्र, पणदरे, सांगवी, आणि माळेगाव या मतदार संघांमध्ये मोठ्या प्रमाणावर क्रॉस वोटिंग झाल्याची चर्चा होती. त्यामुळे या निवडणुकीत उलटफेर होईल, अशी चर्चा होती. मात्र, पहिल्या फेरीतील कलानुसार अजितदादांचे पॅनेल आघाडीवर आहे.
तावरे यांनी याआधी साखर कारखान्याचे अध्यक्षपद भूषवलं आहे. तावरे हे भाजपचे स्थानिक नेते आहेत. तर, दुसरीकडे अजित पवार यांनी आपल्या पॅनेलची सत्ता आल्यास आपणच अध्यक्षपदी असणार असल्याचे जाहीर केले. त्याशिवाय, त्यांनी विविध आश्वासने दिली.