बारामतीत सलग दुसऱ्या दिवशी अपघात झाला. छत्रपती शाहू हायस्कूल समोर एका हायवा टिप्परने स्कूल बस व्हॅनला धडक दिली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी सातत्याने अशा घटना घडत असल्याने बारामतीकरांची चिंता वाढली आहे.
छत्रपती शाहू हायस्कूल समोर अपघात
वाढलेल्या अपघातांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर बारामतीकरांनी निषेध आंदोलन केले. प्रशासनाने आंदोलकांना अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्याबाबत लेखी हमी पत्र दिले होते. हे प्रकरण ताजे असताना आज पुन्हा सायंकाळी छत्रपती शाहू हायस्कूल समोर अपघात झाला. अपघातानंतर बारामतीकरांनी पाटस रोडला रास्ता रोको करत धरणे आंदोलन केले. जोपर्यंत दिवसा अवजड वाहनांची वाहतूक बंद करीत नाहीत तोपर्यंत ठिय्या आंदोलन करणार असा आक्रमक पवित्रा नागरिकांनी घेतला.
advertisement
शाळेसमोरून अवजड वाहनांची ये जा
छत्रपती शाहू महाराज शाळेसमोरून अवजड वाहनांची ये जा असल्याने शाळकरी मुलांना धोका निर्माण झाला आहे. या रस्त्यावर आठवड्यात एखादा अपघात होतोच होतो. त्यामुळे मुलांच्या सुरक्षिततेसाठी अवजड वाहनांना दिवसभर प्रतिबंध असावा, अशी मागणी पालक करीत आहेत. प्रशासनाला तसे लेखी निवेदनही देण्यात आले आहे.