यंदा 2025 मध्ये नवरात्र उत्सव 22 सप्टेंबरपासून सुरू झाला आणि त्यानंतर 2 ऑक्टोबर रोजी विजयादशमी साजरी केली जाणार आहे.
विजयादशमी हा सण विजय, शक्ती आणि शुभतेचा प्रतीकात्मक दिवस मानला जातो. रामायणानुसार, भगवान श्रीरामांनी या दिवशी रावणाचा वध करून धर्माचा विजय मिळवला, तर देवी दुर्गेने महिषासुराचा वध करून शक्तीचा संदेश दिला. प्राचीन काळात राजे आपल्या लष्करी मोहिमांसाठी या दिवशी प्रस्थान करत, त्यामुळे हा दिवस विजयाचा प्रतीक मानला जात होता.
advertisement
दसऱ्याच्या दिवशी शस्त्र पूजेला विशेष महत्त्व असते, कारण शस्त्रांचा आदर केल्याने यश आणि विजय प्राप्त होतो, असे मानले जाते. या दिवशी लोक एकमेकांना आपट्याची पाने देतात आणि “सोनं घ्या, सोनं द्या, सोन्यासारखे रहा” असे शुभ संदेश व्यक्त करतात, जे समृद्धी, ऐश्वर्य आणि सुख-शांतीचे प्रतीक आहे.
आपट्याच्या पानांची परंपरा अयोध्येच्या राजा रघु आणि भगवान श्रीरामांच्या पूर्वजांशी निगडित आहे. राजा रघु अत्यंत दानशील होते आणि त्यांनी वाजपेयी यज्ञात आपले सर्व सुवर्ण ब्राह्मणांना दान केले. यज्ञ पूर्ण झाल्यानंतर ब्राह्मणांना दक्षिणा देण्यासाठी काही सोने उरले नव्हते. त्यानंतर त्यांनी इंद्राची पूजा केली. इंद्र प्रसन्न झाला आणि म्हणाला की, राज्यातील आपट्याचे झाड लोकांसाठी सोने समान ठरेल. याच पारंपरिक कथा आणि श्रद्धेच्या आधारे आजही दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने देवाणघेवाण केली जातात.
शुभार्थ असा आहे की आपट्याची पाने देताना आपण एकमेकांना देतो ते म्हणजे घरात सदैव समृद्धी, ऐश्वर्य, धनधान्य, सुख आणि शांती राहो, यासाठीचा शुभ संदेश.





