नवी कोरी ट्रॅक्टर ट्रॉली घरी आणा, खरेदीसाठी GST कपातीसह सरकार देतंय १ लाख रुपये, अर्ज कुठे करायचा?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Agriculture News : कृषी विभागाच्या वतीने ट्रेलर आणि शेती औजारांवर थेट अनुदान देण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे शेतकऱ्यांचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
मुंबई : महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा जाहीर केला आहे. कृषी विभागाच्या वतीने ट्रेलर आणि शेती औजारांवर थेट अनुदान देण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे शेतकऱ्यांचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
ट्रेलर खरेदीवर अनुदान
शेतकऱ्यांना आता दोन चाकी ३ टन ट्रेलरवर ७५ हजार रुपये, तर ५ टन क्षमतेच्या ट्रेलरवर तब्बल १ लाख रुपये अनुदान मिळणार आहे. ट्रेलर प्रामुख्याने शेतमाल, खते, औजारे व इतर शेतीसंबंधित साहित्य वाहून नेण्यासाठी वापरला जातो. सध्या या ट्रेलरची बाजारातील किंमत २ ते २.५ लाख रुपये इतकी आहे. शासन अनुदानामुळे ही किंमत लक्षणीयरीत्या कमी होणार आहे.
advertisement
शेती औजारांवरही लाभ
शेती मशागतीसाठी आवश्यक असणारी विविध औजारे जसे की,सिंगल पलटी नांगर
डबल पलटी नांगर, हायड्रोलिक पलटी, सरी रेझर, रोटाव्हेटर इत्यादी या औजारांच्या खरेदीसाठी ४० हजार ते ७५ हजार रुपये इतके अनुदान देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती करणे सोपे होईल.
जीएसटी दर घटल्याने दुहेरी फायदा
ट्रेलर आणि शेती औजारांवरील जीएसटी १२ टक्क्यांवरून ५ टक्क्यांवर आणण्यात आला आहे. यामुळे बाजारातील किंमत थेट ४० हजारांपासून १ लाख रुपयांपर्यंत कमी होणार आहे. म्हणजेच शासनाच्या अनुदानासह आणि करसवलतीसह शेतकऱ्यांना दुहेरी फायदा मिळणार आहे.
advertisement
अर्ज प्रक्रिया कशी करायची?
अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्य कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवर अर्ज दाखल करणे आवश्यक आहे.अर्ज करताना शेतकऱ्यांनी पुढील कागदपत्रे तयार ठेवावी. जसे की, आधार क्रमांक, आधार लिंक असलेला मोबाइल क्रमांक, बँक खाते क्रमांक, ७/१२ उतारा. इत्यादी पुढे अर्ज मंजूर झाल्यानंतर अनुदानाची रक्कम थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.
advertisement
पहिले अर्ज, पहिले प्राधान्य
शासनाने स्पष्ट केले आहे की, अनुदानाचे वाटप ‘पहिले अर्ज, पहिले प्राधान्य’ या तत्त्वावर केले जाणार आहे. त्यामुळे इच्छुक शेतकऱ्यांनी विलंब न करता त्वरित ऑनलाइन अर्ज दाखल करावा.
शेतकऱ्यांसाठी दिलासा
शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी लागणाऱ्या साधनसामग्रीवर येणारा खर्च मोठा असल्याने अनेकदा त्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. मात्र शासनाच्या या निर्णयामुळे ट्रेलर आणि शेती औजारे आता परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध होणार आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 30, 2025 11:42 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
नवी कोरी ट्रॅक्टर ट्रॉली घरी आणा, खरेदीसाठी GST कपातीसह सरकार देतंय १ लाख रुपये, अर्ज कुठे करायचा?