Solapur Tuljapur Road: सोलापूर – तुळजापूर महामार्ग 4 दिवस बंद, का आणि कधी? पाहा पर्यायी मार्ग
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
Solapur Tuljapur Road: सोलापूर तुळजापूर महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 4 ऑक्टोबरपासून हा मार्ग 4 दिवस बंद राहणार आहे.
सोलापूर: सोलापूर - तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सध्या नवरात्रौत्सव सुरू असून तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. त्यात कोजागिरी पौर्णिमेला मोठ्या संख्येने भाविक पायी तुळजापूरला जातात. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. 4 ऑक्टोबर पासून चार दिवस सोलापूर-तुळजापूर महामार्गावरून वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी याबाबत आदेश काढला आहे.
कोजागिरी पौर्णिमेनिमित्त श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनाकरिता मोठ्या प्रमाणात भाविक सोलापूरहून तुळजापूरकडे पायी चालत जात असतात. पायी चालत जाणाऱ्या भाविकांना कोणत्याही प्रकारचा अडथळा, गैरसोय व अपघात होऊ नये, यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. 4 ऑक्टोबर पासून ते 7 ऑक्टोबर पर्यंत जुना तुळजापूर नाका- तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग 52 हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
advertisement
सोलापूरहून तुळजापूरकडे कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सोलापूरसह कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यांतील भाविक मोठ्या संख्येने पायी जात असतात. या पायी चालत जाणाऱ्या भाविकांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
पर्यायी मार्ग कोणते?
पुणे महामार्गाकडून छत्रपती संभाजी नगर कडे जाणारी वाहने सोलापुरातील बाळे गाव-बार्शी-येरमाळा मार्गे छत्रपती संभाजी नगरकडे जातील. तर पुणे महामार्गाकडून धाराशिवकडे जाणारी वाहने सोलापूरतील बाळे गाव-बार्शी-वैराग मार्गे धाराशिव कडे जातील. पुणे महामार्गाकडून लातूरकडे जाणारी वाहने सोलापूरतील बाळे गाव-बार्शी-येडशी-ढोकी-मुरूड-मार्गे लातूरकडे जातील. तर सोलापूर-पुणे महामार्गाकडून तुळजापूर कडे जाणारी वाहने हैद्राबाद महामार्गावरील सोलापूर मार्केट यार्ड येथून बोरामणी गाव-इटकळ-मंगरूळ पाटी-मार्गे लातूर असे पर्यायी मार्गाने जातील.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
September 30, 2025 11:35 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
Solapur Tuljapur Road: सोलापूर – तुळजापूर महामार्ग 4 दिवस बंद, का आणि कधी? पाहा पर्यायी मार्ग