बाईक थांबवली, डोळ्यात चटणी टाकून कोयत्याने वार, कोल्हापुरात पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Kolhapur: कोल्हापुरच्या हातकणंगले तालुक्यातील भादोले गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. इथं एका तरुणाने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केली आहे.
कोल्हापुरच्या हातकणंगले तालुक्यातील भादोले गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. इथं एका तरुणाने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केली आहे. आरोपीनं पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकून तिच्यावर कोयत्याने सपासप वार केले. हा हल्ला इतका भयंकर होता की पत्नी जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळली आणि यातच तिचा मृत्यू झाला. ही हत्या केल्यानंतर आरोपी पती घरातून फरार झाला होता. मात्र पोलिसांनी रात्री उशिरा आरोपीला अटक केली आहे.
प्रशांत पाटील असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. तर रोहिणी प्रशांत पाटील असं हत्या झालेल्या २८ वर्षीय महिलेचं नाव आहे. आरोपी प्रशांत आणि रोहिणी हे हातकणंगले तालुक्यातील भादोले गावात एकत्र राहत होते. मात्र मागील आठवडाभरापासून रोहिणीचे वडील आजारी होते. त्यामुळे प्रशांत आणि रोहिणी दोघंही आठ दिवसांपासून रोहिणी यांच्या माहेरी ढवळी इथं ये-जा करत होते. दरम्यान, सोमवारी रात्री साडे आठच्या सुमारास घरी परत येत असताना प्रशांतने पत्नी रोहिणी यांची हत्या केली.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी दोघंही पती-पत्नी ढवळी येथून आपल्या घरी भादोलेला दुचाकीने येत होते. दरम्यान, रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ते कोरेगाव भादोले रस्त्यावरील झुंजीनाना मळ्याजवळ आले. यावेळी प्रशांतने रोहिणी यांच्या डोळ्यात चटणी टाकून तिच्या गळ्यावर आणि चेहऱ्यावर कोयत्याने सपासप वार केले.
पत्नीची हत्या केल्यानंतर प्रशांत घटनास्थळावरून भादोले येथे आला. त्याने गावातील लोकांना पत्नीचा खून केल्याचे सांगितलं. तसेच मुलींकडे लक्ष ठेवा, मी आता पाच-सहा महिने येणार नाही, असे सांगून पळून गेला. या घटनेने गावात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे व अन्य पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घटना स्थळाचा पंचनामा केला. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रं फिरवत रात्री उशिरा संशयित आरोपी प्रशांत पाटील याला ताब्यात घेतले.
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
September 30, 2025 11:22 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
बाईक थांबवली, डोळ्यात चटणी टाकून कोयत्याने वार, कोल्हापुरात पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या