जालिंदर सुरवसे असे या गावातील ग्रामसेवकाचे नाव असून त्यांना काही गावगुंडांनी अमानुष मारहाण केल्याचा प्रकार उघड झाला आहे. या हल्ल्याची गंभीरता इतकी होती की सुरवसे यांच्या अंगावर ठिकठिकाणी वळ उमटले असून शरीर काळं-निळं पडलेलं स्पष्ट दिसत आहे. लाथाबुक्क्यांसह लोखंडी रॉड आणि काठ्यांचा वापर करून त्यांना रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
हल्ल्यामागचं नेमकं कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. ग्रामसेवकाच्या अधिकारातील कोणत्या कामावरून वाद निर्माण झाला की अन्य कोणतं कारण होतं, याबाबत पोलिसांकडून अजून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
घटनेनंतर सुरवसे यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी त्यांची आई आणि बहीण यांनी तलवाडा पोलीस ठाण्यात औपचारिक तक्रार दाखल केली आहे. तक्रारीच्या आधारे गावगुंडांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपासाला वेग दिला आहे.
ग्रामसेवकावर झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ग्रामस्थांमध्ये भयाचे वातावरण असून प्रशासनाकडून कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.
