महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाचा तपास अजूनही झाला नसल्याने त्यांच्या पत्नीने पोलीस अधीक्षक कार्यालयात विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. महादेव मुंडे यांच्या हत्येमागे वाल्मिक कराडचा हात असल्याचे सांगण्यात येत होते. महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आता मोठा दावा केला आहे.
ज्ञानेश्वरी मुंडे यांनी काय सांगितले?
advertisement
ज्ञानेश्वरी मुंडे यांनी न्यूज 18 लोकमत सोबत गौप्यस्फोट केले आहे. महादेव मुंडे यांच्या हत्येचा तपास थांबवण्यासाठी पोलिसांना फोन कॉल आला होता. हा फोन राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावरून आला होता. हा फोन कॉल आल्यानंतर तपास थांबवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता.
आता, ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आरोप केला की, "पतीच्या हत्येचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्याला थांबवण्याचा कॉल थेट धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावरून आला. मात्र, तो फोन खुद्द धनंजय मुंडे यांनी नव्हता केला, तर तो फोन वाल्मिक कराड यांनी केला होता, असा गौप्यस्फोट ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केला.
ज्ञानेश्वरी मुंढे यांनी यापूर्वीच या प्रकरणी आवाज उठवलेले आमदार बाळासाहेब बांगर यांचा उल्लेख करत, "बांगर यांनी केलेले आरोप योग्य आहेत," असेही म्हटले. माझ्यावर अन्याय झाला आहे. पण कोणतीही यंत्रणा माझ्या दु:खाची दखल घेत नाही. न्यायासाठी मी झगडत असल्याचे त्यांनी सांगितले.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड आणि त्याच्या सहकाऱ्यांना अटक झाली आहे. कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे. धनंजय मु्ंडे यांच्यावर टीका सुरू झाल्यानंतर त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर आता महादेव मुंडे प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावरून वाल्मिक कराडने फोन केल्याचा दावा ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केला आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
