बीडमध्ये वाल्मिक कराडचा सहकारी सराईत गुन्हेगार गोट्या गित्ते यांचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात तो एक अघोरी कृत्य करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये दारूच्या नशेत तो 'राम नाम सत्य है' असे म्हणत रात्रीच्या वेळी एका घराबाहेर नैवेद्य ठेवताना दिसतो आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर दुसऱ्या व्हिडिओ मध्ये गोट्या गित्तेचे हातात बंदूक घेतलेले काही व्हिडिओ देखील सोशल मीडियावर आले आहेत.
advertisement
गोट्या गित्ते हा वाल्मिक कराडचा अत्यंत जवळचा आणि विश्वासू सहकारी मानला जातो. याआधी संतोष देशमुख हत्या प्रकरणात "वाल्मिक अण्णा माझे दैवत" अशा आशयाच्या पोस्ट्स त्याने सोशल मीडियावर शेअर केल्या होत्या. त्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला होता.
परळी मधील महादेव मुंडे हत्या प्रकरण बापू आंधळे खून प्रकरण यात अनेकांनी कोट्या गीतेवर आरोप केलेले आहेत. तसेच इतर गुन्ह्यामध्येही पोलिसांना वॉन्टेड आहे. त्यामुळे गोट्याला अटक कधी होणार असा सवाल उपस्थित होत आहे.
महादेव मुंडेंच्या हत्येशी कनेक्शन?
महादेव मुंडे यांच्या हत्येचे प्रकरण सध्या चर्चेत आहेत. मुंडे यांचे कुटुंबीय न्यायासाठी धडपड करत आहे. तर, दुसरीकडे या हत्या प्रकरणात कराडचा निकटवर्तीय राहिलेल्या बाळा बांगरने अनेक धक्कादायक आरोप केले. महादेव मुंडे यांच्या हत्येत श्री व सुशील कराड या वाल्मिक कराडच्या मुलांचा सहभाग असल्याचा आरोप केला होता.
त्याचबरोबर गोट्या गित्ते यांच्यासह आणखी काही जणांनी महादेव मुंडेंना वाईट पद्धतीने मारलं असल्याचा आरोप बांगर यांनी केला.
ज्ञानोबा मारुती गीते असं गोट्या गीतेचं खरं नाव आहे. परळीतील नंदागौळ या गावचा तो रहिवासी असून सराईत गुन्हेगार आहे. मागील काही वर्षात त्याच्यावर बीडसह इतर जिल्ह्यातही गुन्हे दाखल झाले आहेत. बीडमध्ये अनेकांना अग्निशस्त्र पुरवण्याचे काम देखील तो करत असल्याची चर्चा आहे.
