ही घटना बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील सय्यदमीर गावात घडली. छबू देवकर असं हत्या झालेल्या ७२ वर्षीय चुलत्याचं नाव आहे. या प्रकरणी सहाही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवकर कुटुंबामध्ये मागील काही काळापासून शेतातील बांध आणि पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनच्या कारणावरून वाद सुरू होता. शनिवारी सायंकाळी गावातील लोणी सय्यदमीर येथील छबू देवकर यांच्या घरासमोर लहान मुले चेंडू खेळत होती. याच कारणातून देवकर कुटुंबात भांडणाला सुरुवात झाली आणि त्याचे रूपांतर जोरदार हाणामारीत झाले.
advertisement
यावेळी संतप्त झालेल्या पुतण्यांनी आणि त्यांच्या पत्नींनी (सुनांनी) मिळून वृद्ध छबू देवकर यांना कोयता आणि लोखंडी पाइप यांसारख्या धारदार आणि जड शस्त्रांनी मारहाण केली. या जीवघेण्या हल्ल्यात छबू देवकर हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा रविवारी दुर्दैवी मृत्यू झाला.
याप्रकरणी आष्टी पोलिसांनी तातडीने सूत्रे फिरवत तिन्ही पुतण्यांसह त्यांच्या तिन्ही सुना, अशा सहा आरोपींना ताब्यात घेतले आहे. कौटुंबिक वादातून झालेल्या या खुनाच्या घटनेने लोणी सय्यदमीर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. शेतीच्या किरकोळ वादातून एका वृद्धाचा बळी गेल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.