सुरेश जाधव, प्रतिनिधी बीड: बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यात एक मन पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. इथं एका तरुणाने आपल्या चार महिन्यांच्या बाळाची क्रूर पद्धतीने हत्या केली आहे. त्याने पहाटे बाळाला आईच्या कुशीतून उचलून नेत पाण्याच्या ड्रममध्ये बुडवून मारलं आहे. आरोपी वडील एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने स्वत:ही गळफास घेऊन आयुष्याचा शेवट केला आहे. चार महिन्यांच्या बाळाला अशाप्रकारे मारल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
advertisement
अमोल हौसराव सोनवणे असं क्रूर पित्याचं नाव आहे. तो आपली पत्नी पायल आणि चार महिन्यांच्या चिमुकल्यासह गेवराई तालुक्यातील रामनगर इथं राहत होता. शुक्रवारी पहाटे अमोलने आपल्या मुलाला पाण्याच्या ड्रममध्ये बुडून जीव घेतला. त्यानंतर स्वत:ही आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी अमोल सोनवणे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री अमोल आणि पायल दोघंह जेवण करून घरात झोपले होते. पहाटे ३ वाजता आईने आपल्या ४ महिन्यांच्या बाळाला स्तनपान देऊन झोपी घातले. मात्र तासाभरात जाग आलेल्या पित्याने चिमुकल्याला आईच्या कुशीतून उचलून नेत पाण्याच्या ड्रममध्ये बुडवून मारले. त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. गेवराई तालुक्यातील रामनगर येथे शुक्रवारी पहाटे ही घटना घडली.
चार दिवसांपूर्वी दोघांनीही केला आत्महत्येचा प्रयत्न
मयत अमोल हा ट्रकचालक होता, त्याला दारूचे व्यसन होते. त्यामुळे पत्नी पायल हिच्याशी त्याचा वाद होत असे. याच वादातून त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जातंय. ४ दिवसांपूर्वीही दोघांमध्ये असाच वाद झाला होता. भांडण विकोपाला गेल्यानंतर दोघांनीही एकापाठोपाठ कीटकनाशक प्राशन केले होते. चार दिवसांच्या उपचारानंतर गुरुवारी दसऱ्याच्या दिवशी दुपारी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. यानंतर शुक्रवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास अमोलने हे क्रूर कृत्य केलं.
अमोलने केलं होतं दुसरं लग्न
अमोल याचे पायलसोबत झालेले हे दुसरे लग्न होते. दोन वर्षांपूर्वी त्याचे पहिले लग्न झाले होते, मात्र काही महिन्यांतच सततच्या वादातून त्याची पहिली पत्नी माहेरी निघून गेली. त्यानंतर दीड वर्षापूर्वी आष्टी तालुक्यातील पायल हिच्याशी त्याचे दुसरे लग्न झाले होते. पायल ही गरीब घरातील असून तिला आई नाही. ४ महिन्यांपूर्वी या दांपत्याला मुलगा झाला होता. अद्याप बाळाचे बारसे झाले नव्हते, त्यामुळे त्याचे नामकरण केले नव्हते. अमोल पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने दोघांमध्ये वाद होत असल्याची माहिती आहे.