मध्यरात्री तहसील कार्यालयाजवळ हल्ला
ही धक्कादायक घटना शिरूर तालुक्यातील तहसील कार्यालयाजवळील गायरान वस्तीमध्ये घडली. शनिवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाला. १० ते १५ जणांच्या टोळक्याच्या हातात दांडगे, कोयते आणि कुऱ्हाडी असे जीवघेणे शस्त्र होते. या टोळक्याने खोक्या भोसलेच्या कुटुंबातील महिलांवर अमानुष हल्ला केला.
जीव वाचवण्यासाठी महिलांनी मोठ्याने आरडाओरडा केला, मदतीसाठी किंकाळ्या फोडल्या, पण हल्लेखोरांनी मारहाण करणं सुरूच ठेवलं. त्यांनी थेट डोक्यावर, पाठीत आणि पायांवर वार केले. या हल्ल्यात सर्व महिलांना दुखापत झाली.
advertisement
चार महिला गंभीर जखमी
जखमी महिला कशाबशा शिरूर पोलीस ठाण्यात पोहोचल्या आणि त्यांनी तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने दखल घेत जखमी महिलांना बीडच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या त्यांच्यावर तिथे उपचार सुरू आहेत. या हल्ल्यात चार महिला गंभीर जखमी झाल्या असून, एका महिलाची प्रकृती अत्यवस्थ असल्याची माहिती मिळाली आहे.
हल्ल्यामागे काय कारण?
प्राथमिक माहितीनुसार, "अनेक वेळा सांगून देखील या ठिकाणी का राहता?" असे म्हणत या टोळक्याने सतीश भोसलेच्या कुटुंबाला जबर मारहाण केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. शिरूर पोलीस सध्या या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करत आहेत आणि आरोपींचा शोध युद्ध पातळीवर सुरू आहे.
कोण आहे सतीश उर्फ खोक्या भोसले?
सतीश भोसले उर्फ खोक्या भाई हा शिरूर कासार तालुक्यातील झापेवाडीचा रहिवासी आहे. गेल्या पाच वर्षांपासून तो राजकारणात सक्रिय आहे आणि त्याची ओळख भाजप आमदार सुरेश धस यांचा जवळचा सहकारी म्हणून आहे. सतीश भोसलेवर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. नुकताच बुलढाणा जिल्ह्यातील एका तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी त्याला बीड न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.