या संदर्भात पायल चव्हाण (रा. भवानीनगर तांडा, उमापूर) यांनी पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचा विवाह 12 ऑगस्ट 2018 रोजी नितीन देवीदास चव्हाण यांच्याशी हिंदू रीतिरिवाजानुसार झाला. विवाहानंतर सुरुवातीची तीन ते चार वर्षे सासरकडील मंडळींनी नीट वागणूक दिली. या कालावधीत पायलला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन अपत्ये झाली.
advertisement
काही काळानंतर अचानक सासरच्यांचा दृष्टिकोन बदलला. पती नितीन चव्हाण, सासू पारुबाई चव्हाण, सासरे देवीदास चव्हाण, दिर संतोष चव्हाण आणि जाऊ संजना चव्हाण यांनी पायलला नापसंती दर्शवू लागून ट्रॅक्टरसाठी दोन लाख रुपयांची मागणी केली. ही रक्कम न दिल्यास तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू करण्यात आला, असं फिर्यादीत म्हटलंय.
या छळाबाबत पायलने आपल्या आई-वडिलांना आणि नातेवाईकांना माहिती दिली होती. त्यांनी सासरच्यांशी चर्चा करून समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र पैशांच्या मागणीवर ते ठाम राहिले. छळ कमी होण्याऐवजी अधिकच वाढल्याचा आरोप फिर्यादीत आहे. वारंवार मारहाण, शिवीगाळ आणि धमक्यांमुळे पायल मानसिकदृष्ट्या खचून गेली होती.
अखेर 15 डिसेंबर 2025 रोजी ट्रॅक्टरसाठीची मागणी पूर्ण न झाल्याने पायलला मारहाण करून घरातून हाकलून देण्यात आले. यानंतरही सासरच्या लोकांनी माहेरी येऊन पुन्हा पैशांची मागणी करत जिवे मारण्याच्या धमक्या दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी चकलांबा पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत पतीसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.






