धाराशिव जिल्ह्यातील खामकरवाडी येथे बीड पोलिसांनी सोमवारी सिनेस्टाइल कारवाई केली. लुटलेले 11 तोळे सोने व रोख रक्कम असा सुमारे 14 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. विशेष म्हणजे संभाव्य हल्ल्याचा धोका लक्षात घेऊन ड्रोन, आरसीपी व 100 पोलिसांचा फौजफाटा तैनात ठेवण्यात आला होता.
या कारवाईपूर्वी पोलिसांनी अत्यंत काळजीपूर्वक नियोजन केले. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या खामकरवाडी वस्तीची आधी ड्रोन कॅमेऱ्याद्वारे रेकी करण्यात आली. वस्तीतील हालचाली, घरांची रचना व पळवाटा यांचा अभ्यास झाल्यानंतर दुपारी चारच्या सुमारास अचानक चोहोबाजूंनी घेराव घालण्यात आला. जवळपास तासभर पोलिसांनी घराघरात झडती घेतली. वाहनांच्या लांबच लांब रांगा, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आणि आकाशात घिरट्या घालणारा ड्रोन यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली होती.
advertisement
‘आई, लवकर पैसे पाठतो..., सकाळचा ‘तो’ फोन शेवटचा, 19 वर्षीय तरुणासोबत घडलं भयंकर
बाप-लेकांना ताब्यात घेतलं
या प्रकरणात अनिल राम काळे आणि त्याची दोन मुले राहुल व विकास काळे यांना ताब्यात घेण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच या बापलेकांना पोलिसांनी पाठलाग करून अटक केली होती. त्यावेळी कारची काच न उघडल्याने ती फोडून आरोपींना बाहेर काढावे लागले होते आणि त्यात तीन पोलिस कर्मचारी जखमी झाले होते. चौकशीत चार लूटमारीचे गुन्हे उघडकीस आले. या गुन्ह्यांतील मुद्देमाल हस्तगत करण्यासाठीच सोमवारी विशेष पथक खामकरवाडीत दाखल झाले होते.
मुद्देमाल देण्यास टाळाटाळ
झडतीदरम्यान सुरुवातीला आरोपी मुद्देमाल देण्यास टाळाटाळ करत होते. मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच अखेर किचनमधील एका डब्याकडे बोट दाखवण्यात आले. तो डबा उघडताच त्यात मनी मंगळसूत्र, गंठन, सोन्याची चैन आणि रोख रक्कम असा मोठा साठा आढळून आला. पंचांसमोर हा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला. घरात उपस्थित असलेल्या आरोपींच्या आईने ‘माझ्या मुलांना सोडा’ अशी विनवणी केल्याने वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले होते.
हल्ल्याचा धोका, 100 पोलिसांचा बंदोबस्त
ही संपूर्ण कारवाई पोलिस अधीक्षक नवनीत काँवत आणि अपर अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी व स्थानिक पोलिसांच्या संयुक्त पथकाने केली. वस्तीतील संभाव्य हल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन आरसीपीसह शंभर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अद्याप तिघे साथीदार फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. या धाडसी आणि नियोजनबद्ध कारवाईमुळे महामार्गावरील लूटमारीला मोठा आळा बसेल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.






