रवींद्र शिंदे असं मारहाण झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचं नाव आहे. ते २०१३ साली पोलीस उपनिरीक्षक (PSI) म्हणून बीड पोलीस दलात रुजू झाले होते. अलीकडेच संबंधित विवाहित महिलेनं शिंदे यांच्यावर अत्याचाराचे आरोप केले आहे. अत्याचारातून आपण गर्भवती राहिल्याचा देखील तिने आरोप केला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यापासून रवींद्र शिंदे फरार होते. आता ज्या महिलेनं आरोप केला होता, तिच्यासोबत बीड शहरात फिरताना ते आढळले आहेत. याची माहिती महिलेच्या पतीला मिळताच त्यांनी दोघांना रंगेहाथ पकडून भररस्तात मारहाण केली.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी रवींद्र शिंदे हे पीडित विवाहितेच्या शेजारी राहत असल्याने त्यांची ओळख झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. शिंदे यांची धाराशिव येथे बदली झाल्यानंतरही त्याने पीडितेच्या घरात घुसून पिस्तूलचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आहे. हा प्रकार जून आणि जुलै २०२५ दरम्यान घडला असून, याच काळात पीडिता गर्भवती राहिल्याची माहिती समोर आली होती. या अत्याचारप्रकरणी जुलै महिन्याच्या अखेरीस शिंदेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तेव्हापासून शिंदे फरार होते.
शुक्रवारी भररस्त्यात पतीचा संताप
फरार असलेला शिंदे बीडमध्ये येऊन पीडितेसोबत फिरत असल्याची माहिती मिळताच पीडितेच्या पतीने पाळत ठेवली. शुक्रवारी दुपारी सुमारे दोन वाजता, पीडिता आणि शिंदे एका कारमधून (एमएच २३ बीसी ३४०२) भाग्यनगर परिसरात फिरत असताना पतीने त्यांना पाहिले. पतीने त्यांचा पाठलाग सुरू केला. तुळजाई चौक, नगर नाका आणि अखेरीस बसस्थानकासमोर पतीने आपली दुचाकी आडवी लावून कार थांबवली. संतापाच्या भरात त्यांनी शिंदेला कारमधून खाली खेचले आणि कपडे फाटेपर्यंत बेदम मारहाण केली. या गोंधळामुळे बसस्थानकासमोर मोठी गर्दी जमली होती.
