या अपघातात श्रीकांत नानासाहेब खांबकर (वय 20) आणि महेश आप्पासाहेब खांबकर (वय 22) या दोघांचा मृत्यू झाला. दोघेही वनवेवाडी मातकुळी (ता. आष्टी) येथील रहिवासी असून, शेतकरी कुटुंबातील कष्टकरी तरुण म्हणून त्यांची गावात ओळख होती. शेतीत काहीतरी नवीन करून दाखवण्याची जिद्द मनात बाळगून ते पुढील नियोजनासाठी कृषी प्रदर्शनाला गेले होते. मात्र, नियतीने त्यांच्यावर घाला घातला आणि त्यांचे स्वप्न अपूर्णच राहिले.
advertisement
MPSC परीक्षेत राज्यात प्रथम आलेला तरुण आढळला मृतावस्थेत, कारमध्ये सापडली बॉडी
रविवारी श्रीकांत आणि महेश हे बारामती येथे आयोजित कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी गेले होते. पारंपरिक शेतीपद्धतीऐवजी बदल करून केळी लागवडीसारखी आधुनिक शेती करण्याचा त्यांचा विचार होता. यासाठी आवश्यक माहिती, तंत्रज्ञान आणि मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने त्यांनी कृषी प्रदर्शनाला भेट दिली होती. प्रदर्शन पाहून समाधान व्यक्त करत ते त्याच रात्री दुचाकीवरून आपल्या गावाकडे परतत होते.
दरम्यान, जामखेड-श्रीगोंदा मार्गावरील मिरजगावजवळील पुलावर एका अज्ञात वाहनाने अचानक हूल दिल्याने दुचाकीचा तोल गेला. दुचाकी थेट पुलाच्या खाली कोसळली. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. यामध्ये श्रीकांत याचा जागीच मृत्यू झाला, तर महेश याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याच रात्री महेशनेही प्राण सोडले.
या दुर्दैवी घटनेनंतर सोमवारी दोघांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. गावातील प्रत्येक डोळा पाणावलेला होता. तरुण वयात दोन होतकरू शेतकरी गमावल्याने कुटुंबीयांसह संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विशेष म्हणजे या घटनेबाबत अद्याप पोलिस दप्तरी नोंद झालेली नसल्याची माहिती असून, ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. शेतीत बदल घडवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या या दोन तरुणांचे अचानक असे जाणे, ही घटना अनेकांना अंतर्मुख करणारी ठरली आहे.






