राजकीय पटलावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची चर्चा होत असताना दुसरीकडे बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे गटाच्या बेस्ट कामगार सेनेने मनसेच्या कामगार संघटनेसोबत हातमिळवणी केली. त्यामुळे ठाकरे ब्रँडची चर्चा सुरू झाली. बेस्टच्या निवडणुकीत ठाकरे ब्रँडच्या मुद्याला अधिकच हवा देण्यात आली होती. या निवडणुकीत कामगार नेते शशांक राव यांच्या पॅनेलचे 14 उमेदवार निवडून आले. तर आमदार प्रसाद लाड यांच्या नेतृत्वातील भाजप-शिंदे गटाच्या पॅनलचे सात जण विजयी झाले. ठाकरे बंधूंच्या पॅनेलला एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. निवडणुकीतील पराभवाची पराभवाची जबाबदारी स्विकारत पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंकडे राजीनामा दिला आहे, अशी माहिती समोर आली आहे.
advertisement
निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या पॅनेलचा सुपडासाफ
महापालिका निवडणुकीआधी ठाकरे बंधू एकत्र आल्याने बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत काय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. तसेच विरोधकांकडून ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असताना पतपेढीची निवडणूक मतपत्रिकेवर होत असल्याने निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले होते. परंतु याच निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या पॅनेलचा सुपडासाफ झाला. शिवसेना मनसे यांनी बऱ्याच कालावधीनंतर एकत्र निवडणूक लढवली होती . 21 उमेदवारांपैकी एकही उमेदवार सेना मनसे युतीला निवडून आणता आला नाही.
ठाकरेंना मोठा फटका
बेस्ट कामगार सेनेत मागील काही वर्षांपासून एकाच व्यक्तीच्या हाती कारभार असल्याची टीका सातत्याने सुरू होती. संघटनेत असलेला एककल्ली कारभार, उपक्रमातील संघटनेतील नेतृत्वात न झालेल्या बदलामुळे संघटना कामगारांपासून काहीशी दुरावली होती. त्यामुळे याचा फटका ठाकरेंना बसल्याची चर्चा आहे.