हा तरुण तलावात उडी घेत असल्याचं दिसत आहे. तर मित्र रील करण्यात बिझी होते. तलावात जास्त खोल नसेल असा त्याचा अंदाज होता. मात्र लांब सूर मारताच तो गटांगळ्या खाऊ लागला. त्याने आवाजही दिला, जीव वाचवण्यासाठी धडपड करू लागला. मात्र मित्रांना तो एक रीलचाच भाग आहे असं वाटलं आणि त्यामुळे ते वाचवण्यासाठी पुढे आले नाहीत. ते रील काढण्यात मग्न झाले.
advertisement
या तरुणाने वाचवा वाचवा अशी हाक सुद्धा मारली, मात्र हा रीलचाच भाग असावा असं त्याच्या मित्रांना वाटलं आणि त्यांनी दुर्लक्ष केलं. मात्र तेच या तरुणाच्या जीवावर बेतलं. जर त्याला वेळीच मदत मिळाली असती तर तो वाचू शकला असता. मात्र रीलचा नाद जीवावर बेतला आहे. तीर्थराज बारसागडे असं मृत तरुणाचं नाव आहे. तीर्थराज बारसागडे कोंढा येथील जागृती कनिष्ठ महाविद्यालयात बारावीला शिकत होता.
रविवार सुट्टीचा दिवस असल्याने तीर्थराज आपल्या गावातील दोन मित्रांना घेऊन शेतात गेला होता. शेताजवळ असलेल्या तलावात आपल्या मित्रांना सेल्फी काढण्यास आणि व्हिडीओ बनवण्यास त्याने सांगितले. झाडावरून तलावाच्या पाण्यात उडी मारण्याचा प्रयत्न करत असतानाच, त्याला पाण्याचा अंदाज आला नाही आणि त्यातच त्याचा बुडून मृत्यू झाला.
सोबत असलेल्या त्याच्या मित्रांनी तात्काळ ही माहिती गावकऱ्यांना दिली. पाहता-पाहता घटनास्थळी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. घटनेची माहिती अड्याळ पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह पाण्याबाहेर काढला. घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. त्यानंतर, सोनेगाव येथील स्थानिक स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात तीर्थराजवर अंत्यसंस्कार पार पडले. या घटनेने सोनेगाव आणि कोंढा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.