त्रिभाषा सूत्राच्या विरोधात शिवसेना ठाकरे गट आणि मनसे हे मराठीच्या मुद्यावर एकत्र आले. त्यानंतर मराठी विजय मेळाव्याच्या निमित्ताने जवळपास 20 वर्षानंतर उद्धव आणि राज ठाकरे एकाच मंचावर आले. त्यानंतर ठाकरे गट आणि मनसेच्या युतीची चर्चा रंगली. या मेळाव्याच्या आधी आणि नंतर राज्यातील काही ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाचे शिवसैनिक आणि मनसैनिकांनी एकत्र आंदोलने, कार्यक्रमे घेतली. त्यातून दोन्ही पक्षांमधील संभाव्य युतीची चर्चा जोर धरू लागली होती.
advertisement
राज ठाकरेंचे मौन बाळगण्याचे आदेश...
आगामी निवडणुकीत ठाकरे गटासोबतच्या युतीवरून राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना मौन बाळगण्याचे आदेश दिले. प्रवक्ते अथवा कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी भाष्य करू नये, अशी सूचना राज ठाकरे यांनी केली होती. त्यामुळे युतीबाबत संभ्रम तयार झाला होता.
पदाधिकार्यांनी मनमोकळं केलं. केली मोठी मागणी...
इगतपुरी येथील शिबिरात मुंबई महानगर आणि जवळपास जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचे शिबीर सुरू आहे. या शिबिरात राज ठाकरे दोन दिवस उपस्थित होते. यातील एका सत्रात राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत, त्यांच्या मनातील प्रश्नांना उत्तरे दिली. त्याशिवाय, त्यांनी बैठकही घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत एकूण 120 पैकी तब्बल 90 पदाधिकाऱ्यांनी युतीची मागणी केली. आगामी निवडणुका लक्षात घेता पक्ष स्वतंत्र लढावा की युती करावी, यावर गंभीर चर्चा झाली. या चर्चेला उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले, "निवडणुकीला अजून वेळ आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ. पण तो निर्णय मी एकटा घेणार नाही, तुम्हाला विचारूनच घेईन असे राज ठाकरे यांनी म्हटले.
राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना पुढील नियोजनाबाबत महत्त्वाच्या सूचना दिल्या. "स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला अजून वेळ आहे. सध्या सर्वांच्या लक्षात बुथ पातळीवरील संघटन रचना, मतदार याद्या, आणि बुथप्रमुखांची नियुक्ती यावर केंद्रीत असावं," अशा स्पष्ट सूचना त्यांनी केल्या.
या शिबिरात पक्षसंघटनेच्या मजबुतीकरणासोबतच राज्यभरातील राजकीय संभाव्यता आणि आघाडीची दिशा ठरवण्यासाठी विचारमंथन झालं. मनसेला आगामी महापालिका निवडणुकांसाठी आघाडी करावी का, याबाबत पदाधिकारी गटांमध्ये मतभिन्नता असली तरी बहुसंख्य पदाधिकाऱ्यांचा कल युतीकडे असल्याचं स्पष्ट झालं आहे.