डोंबिवलीच्या भाजप गोटात गेल्या काही दिवसांपासून धुमसत असलेला अंतर्गत वाद अखेर शांत झाला आहे. भाजपचे माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे यांनी थेट पक्षातील वरिष्ठांकडून सहकार्य मिळत नसल्याचा आरोप करत सपत्नीक पक्षातील पदांचा राजीनामा दिला होता. त्यांच्या या निर्णयामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली होती.
म्हात्रे हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या तसेच शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. परंतु भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्या मध्यस्थीमुळे बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या भागात डॅमेज कंट्रोल केले आहे. सोमवारी रात्री मुंबईत नंदू परब यांच्या पुढाकाराने प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व विकास म्हात्रे यांची प्रत्यक्ष भेट घडवण्यात आली. या बैठकीत म्हात्रे यांनी मांडलेल्या तक्रारींचं निरसन करण्यात आलं. त्यांचे गैरसमज दूर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
यापूर्वीही एकदा त्यांनी पक्षातील पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे या वेळी त्यांनी पक्षाबाहेर जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे व शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे यांनी देखील त्यांची भेट घेतल्याचे समोर आले होते. त्यामुळे म्हात्रेंच्या निर्णयाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.
म्हात्रे यांनी सांभाळली विविध जबाबदारी...
भाजपकडून म्हात्रे अनेक चांगल्या संधी देण्यात आल्या. राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर म्हात्रे यांना घरातच दोन नगरसेवक, स्थायी समिती सभापतीपद, गटनेतेपद, आणि आमदार निधीतून कोट्यवधींचा विकास निधी मिळवून देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर त्यांनी थेट प्रदेशाध्यक्षांवर नाराजी व्यक्त करत राजीनामा दिल्याने पक्षात अंतर्गत उलथापालथ झाली होती.