ठाकरे गटाला खिंडार...
सुधाकर बडगुजर आणि बबन घोलप शेकडो वाहनांच्या रॅलीसह आणि हजारो कार्यकर्त्यांना घेऊन मुंबईकडे रवाना होणार आहेत. त्यांच्या वाहनांवर आणि बॅनरवर भाजप नेते, तसेच प्रवेशाला विरोध करणाऱ्या आमदार सीमा हिरे यांचे फोटो असणार असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला मिळाली आहे. बडगुजर आज पक्ष प्रवेशाच्या वेळी शक्तीप्रदर्शन करणार असल्याचे म्हटले जात आहे. मुंबईतील पक्ष प्रवेशासाठी 200 कार आणि 100 बसचा ताफा बडगुजर, घोलप पक्ष प्रवेशाच्या वेळी मुंबईत नेणार आहेत.
advertisement
ठाकरे गटाला जय महाराष्ट्र, भाजपात कोणाचा प्रवेश?
आज, बडगुजर आणि घोलप यांच्यासह माजी महापौर नयन घोलप, माजी सभागृह नेते दिलीप दातीर, शिवसेना उपजिल्हा प्रमुख देवानंद बिरारी भाजपात प्रवेश करणार आहेत. बडगुजर यांच्यासोबत आज ठाकरे गटाचे 2 उपनेते, 1 माजी मंत्री, 2 माजी महापौर, 1 स्थायी समिती सभापती, 2 माजी सभागृह नेते आणि
10 हून अधिक नगरसेवक भाजपात प्रवेश करणार आहेत.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे त्यांच्या पक्षाचे नाशिकचे प्रभारी आहेत. काही दिवसांपूर्वीच गिरीश महाजन यांनी ठाकरे गट शिल्लकच राहणार नाही, असे म्हटले होते. त्यावरून दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक झडली होती.
राष्ट्रवादी पवार गटालाही धक्का
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते हे देखील आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. या तीन नेत्यांच्या आगमनामुळे नाशिकमधील भाजपची ताकद लक्षणीयपणे वाढणार आहे. विशेषतः आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, हे तिन्ही नेते भाजपला जवळपास 30 हून अधिक जागांवर यश मिळवून देऊ शकतात.
रात्री उशिरा खलबतं...
या प्रवेशामागे मंत्री गिरीश महाजन यांची रणनीती महत्त्वाची मानली जात आहे. रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री रवींद्र चव्हाण आणि महाजन यांच्यात यासंदर्भात महत्त्वाची बैठक झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
बडगुजरांवर भाजपने केले होते गंभीर आरोप...
भाजपने आरोप केलेला आणखी एक नेता त्यांच्या पक्षात सामील होत आहे. सुधाकर बडगुजर हे शिवसेनेत असताना भाजपने त्यांच्याविरोधात आंदोलन केले होते. बडगुजर यांचे मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा निकटवर्तीय गुंड सलीम कुत्ता यांच्याशी संबंध असल्याचा आरोप भाजपने केले होते. बडगुजर यांची चौकशी देखील झाली होती.