देशात आणि महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आहे पण याच सरकारचे आमदार रस्त्या-रस्त्यावर उतरून जनआक्रोश मोर्चे काढतायेत. या जनआक्रोश मोर्चातून मुस्लिम धर्मियांविरोधात एल्गार पुकारून एकप्रकारे हिंदू खतरे में हैचाच नारा दिला जातोय. नेत्यांचा मुस्लिम विरोध इथेच थांबत नाहीय. आगामी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हिंदूंकडून खरेदीचं आवाहन करत, एकप्रकारे मुस्लिमांवर बहिष्काराचा नारा दिला जातोय. राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी मुस्लिमांकडून खरेदी करू नका, असे आवाहन केले.
advertisement
संग्राम जगतापांच्या वक्तव्यानंतर अजित पवारांनी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. पण, जगतापांचा मुस्लिम द्वेषाचे प्रताप काही थांबत नाहीयेत. त्यामुळं संगमनेरच्या जनआक्रोश मोर्चात पुन्हा एकदा मुस्लिम धर्मियांवर टीकास्त्र डागलं. जिहादी लोकच स्त्रियांवर अन्याय करतात म्हणत त्यांनी मुस्लिम धर्मियांना टार्गेट केले.
हिंदूंवरील होणारे हल्ले असो किंवा मग हिंदू मुलींवरील अत्याचाराचा मुद्दा. सत्ताधारी आमदारच हिंदू जनआक्रोश मोर्चाच्या माध्यमातून सरकारवर दबाव टाकतायेत. पण, सत्ताधारी आमदारांचा हा आक्रोश नेमका कुणाविरोधात आहे? राज्याची कायदा व सुव्यवस्था सांभाळणारे आपल्याच सरकारवर दबाव टाकण्याची वेळ या आमदारांवर आलीय? हा सवाल विरोधक करतायेत.
गुन्हेगाराला गुन्हेगार म्हणून पाहायला हवे. तो कोणत्या जातीचा किंवा धर्माचा आहे यावरुन त्याने केलेल्या गुन्ह्याचे मूल्यमापन होत नाही. पण, राजकीय स्वार्थासाठी आणि आपला हेतू साध्य करण्यासाठी गुन्हेगारांचा धर्म शोधण्याचा नवा पायंडा काही संधीसाधूंनी पाडलाय. त्यामुळे एखाद्या घटनेवरून संपूर्ण धर्माला लक्ष्य करणं खरंच योग्य आहे का? याचा विचार सर्वांनीच करायला हवा. त्याचवेळी मुस्लिमांवर बहिष्कार टाकून खरंच हिंदुत्वाला बळकटी मिळेल का? हाही प्रश्न आहे.