एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंच्या विरोधात बंडाचे निशाण फडवले. एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत जात राज्यात महायुतीचे सरकार आणले. विधानसभा निवडणुकीतील प्रचंड बहुमताने महायुतीने सत्तेत पुनरागमन केले. आता, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसण्यास सुरुवात केली आहे.
भाजपने आपले मंत्री गणेश नाईक यांना ठाण्यात फ्री हँड दिल्याची चर्चा आहे. नाईकांनी थेट ठाण्यात जनता दरबार सुरू केला आहे. या माध्यमातून शिवसेना शिंदे गटापेक्षा भाजप अधिक सक्रीय असल्याचे दाखवण्यात येत आहे. ठाण्यात शिवसेना शिंदे गटाला घेरण्यासाठी भाजपने आक्रमक रणनीती अवलंबली आहे.
advertisement
ठाणे भाजपचा बालेकिल्ला, भाजप आमदारांनी शिंदेंना डिवचलं...
भाजपचे आमदार संजय केळकर यांनी पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गटाला डिवचलं आहे. ठाणे जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे 9 आमदार असल्याचे त्यांनी सांगितले. आमच्या 9 आमदारांच्या संख्याबळाच्या जवळपास कोणी नाही असे त्यांनी म्हटले. सामान्य माणसाचा आम्हाला पाठिंबा मिळत आहे. वेळ पडेल तर सर्वांना सोबत घेऊन जाऊ. पण आता भाजप थांबणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
ठाणे महापालिकेतील भ्रष्टाचार समोर आणणार...
आमदार संजय केळकर यांनी म्हटले की, प्रशासनाने योग्य ते गोष्टी जनतेला दिले पाहिजे. ठाणे महापालिकेत कचऱ्यापासून ते अनेक गोष्टींवरील गैरव्यवहाराविरोधात मी आवाज उठवला. येणाऱ्या काळात पुराव्यासह मी सगळं काही समोर आणणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. चौकीदाराचं काम आम्हाला करायलाच पाहिजे. करोडो रुपये या महानगरपालिकेमध्ये येतात. या पैशाचा वापर लोकांपर्यंत झाला पाहिजे असेही केळकर यांनी म्हटले. संजय केळकर यांनी ठाणे महापालिकेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा काढत शिंदे गटाला अडचणीत आणणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
