BMC Reply Manoj jarange Patil : सरकारने आंदोलकांच्या शौचालयासाठी केलेली व्यवस्था कुलुप बंद होती. चहा आणि वडापावची दुकानं बंद केली. त्यामुळे आमच्या पोरांना चहा पाणी मिळालं नाही, जेवायला मिळालं नाही.मुंबईत मराठ्यांचे हाल झाले, तुम्ही इंग्रजापेक्षाही बेकार झालात असा हल्लाबोल मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर केला होता.या आरोपानंतर लगेचच मुंबई महानगरपालिकेने 9 मुद्यांमध्ये जरांगे यांचा आरोप खोडून काढला आहे.
advertisement
जरांगेंच्या आरोपावर मुंबई महापालिकेच उत्तर
मनोज जरांगे यांच्या या आरोपानंतर आता मुंबई महानगरपालिकेने आंदोलनस्थळी पुरविलेल्या सेवा सुविधांची माहिती दिली आहे.
1) आझाद मैदान व आजूबाजूच्या परिसरातील ‘पैसे घ्या व वापरा’ तत्वावरील सर्व सार्वजनिक शौचालये ही आंदोलकांच्या वापरासाठी मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
2) आझाद मैदानाच्या आतल्या बाजूस एकूण 29 शौचकुपे असणारे शौचालय आंदोलकांच्या वापरासाठी विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले आहे.
3) आझाद मैदानास लागून असलेल्या महात्मा गांधी मार्गावर प्रत्येकी 10 शौचकुपे असणारी एकूण तीन फिरती शौचालये उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
4) कार्यकारी अभियंता (परिवहन) (पश्चिम उपनगरे) यांच्या कार्यालयामार्फत आझाद मैदानातील मेट्रो साइटच्या बाजूला एकूण 12 फिरती (पोर्टेबल) शौचालये पुरविण्यात आली आहेत. तसेच आणखी शौचालये पुरविण्यात येत आहेत.
5) आंदोलनस्थळी आंदोलकांना पिण्याच्या पाण्यासाठी एकूण 6 टॅंकर्स पुरविण्यात आले आहेत. तसेच अतिरिक्त टॅंकर्स मागविण्यात आले आहेत.
6) पावसामुळे आंदोलन स्थळी मैदानावर चिखल होत होता. नागरिकांना इजा होवू नये यासाठी, आंदोलन स्थळी प्रवेशमार्गामध्ये झालेला चिखल हटवून, त्या मार्गिकेवर 2 ट्रक खडी टाकून रस्ता समतल करण्यात आला आहे.
7) वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत नागरिकांच्या उपचार व वैद्यकीय तपासणीसाठी वैद्यकीय मदत कक्ष उभारण्यात आला आहे. तसेच १०८ रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
8) पावसाळी स्थिती लक्षात घेता, आझाद मैदान व आजूबाजूच्या परिसरात कीटकनाशक धूम्रफवारणी करण्यात आली आहे.
9) आंदोलन स्थळ व संपूर्ण आजूबाजूच्या परिसरात पुरेशा संख्येने कर्मचारी नेमून स्वच्छता करण्यात येत आहे.
मनोज जरांगेंचा आरोप काय?
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज आझाद मैदानावरील एकदिवसीय आंदोलनानंतर माध्यमांना संबोधित केले होते.यावेळी मुंबईच मराठ्यांचे हाल झाल्याचा आरोप केला.कारण आंदोलन स्थळावरील शौचालये कुलुप बंद असल्याचा दावा जरांगे यांनी केला होता.
सरकारने मराठ्यांच्या शौचालयाची व्यवस्था केली, पण तीही कुलूप बंद होती. तसेच चहा आणि वडापावची जी दुकानं होती तेही बंद केली. त्यामुळे आमच्या पोरांना चहा पाणी मिळाला नाही, जेवायला मिळालं नाही. म्हणून आमची पोरं सीएसएमटी स्थानकात गेल्याचे मनोज जरांगे सांगतात. त्यामुळे तुम्ही इंग्रजापेक्षाही बेकार झालात अशी टीका जरांगे यांनी सरकारवर केली.