जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे २४ जुलै रोजी नाकीबंदी दरम्यान एका कारमधून पोलिसांनी ६४ कोटी ९० लाख रुपये किमतीचे अँफेटामाईन ड्रग्स हे अत्यंत घातक अमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले होते.
या प्रकरणाची तपासणी करताना पोलिसांनी आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश केला असून तामिळनाडूमधील नागापट्टम जिल्ह्यातील विलुंदामावडी येथून ड्रग्स प्रकरणातील मुख्य सूत्रधार महालिंगम नटराजन यास अटक केली आहे. तर या प्रकरणातील दुसरा आरोपी महालिंगम नटराजन याचा मुलगा योगेश नटराजन हा विदेशात फरार होण्यास यशस्वी झाला आहे. विलुंदामावडी हे गाव श्रीलंकेच्या समुद्रकिनाऱ्यापासून जवळ असल्याने जल वाहतुकीद्वारे महालिंगम नटराजन याच्याकडून परदेशातही ड्रग्स तस्करी केली जात असल्याचा पोलिसांना संशय आहे.
advertisement
विशेष म्हणजे अटक करण्यात आलेला ड्रग्स प्रकरणातील मुख्य सूत्रधार याची राजकीय पार्श्वभूमी समोर आली असून महालिंगम नटराजन आणि त्याची पत्नी हे विलुंदामावडी येथील माजी सरपंच आहे तर महालिंगम नटराज यांचा दुसरा मुलगा ॲलेक्स महालिंगम हा जिल्हा परिषदेचा माजी सदस्य असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात दिल्ली येथील कारचालक असीम अब्दुल सय्यद यास पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. तर देशभर या ड्रग्स तस्करीचे पाळेमुळे रोवल्या गेल्याचा पोलिसांना संशय आहे.
दरम्यान, ड्रग्स वाहतूक करणाऱ्या कारचालक अब्दुल सय्यद याला एका खेपसाठी मिळायचे हवालामार्गे १० ते १५ लाख रुपये मिळत असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे त्यामुळे पोलीस अब्दुल्ला दिल्ली येथे नेत हवाला रॅकेट देखील तपासणार आहेत. पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमित मनेळ आणि त्यांचे अधिकारी या संपूर्ण प्रकरणाचा तपास करीत आहे.
