अंगारकी निमित्त प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी अपेक्षित असल्याने, छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. यामुळे या मार्गाने स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असं आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केलं आहे.
advertisement
अंगारकी चतुर्थी हा दिवस गणेश भक्तांसाठी विशेष मानला जातो. यानिमित्ताने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरात सकाळपासूनच भाविकांच्या रांगा लागतात. पुणे शहर, जिल्हा तसेच बाहेरील भागातूनही भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज रोड परिसरात मोठी गर्दी होण्याची शक्यता असते. गर्दीमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रस्ताच बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पर्यायी मार्ग
शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनांनी टिळक रस्त्यावरील पूरम चौकातून बाजीराव रोडमार्गे जाण्याऐवजी टिळक रोड, अलका टॉकिज, डेक्कन जिमखाना या मार्गाचा वापर करावा.
स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांनी स. गो. बर्वे चौकातून (मॉडर्न कॅफे) जंगली महाराज रोड, झाशीची राणी चौक, खंडुजीबाबा चौक, टिळक रोडमार्गे इच्छितस्थळी पोहोचावे.
अप्पा बळवंत चौक ते हुतात्मा चौक (बुधवार चौक) हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.
नागरिकांनी संयम राखावा आणि प्रवासासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असं वाहतूक पोलिसांनी आवाहन केलं आहे. वाहनांनी अनावश्यकपणे या भागात प्रवेश टाळावा, असंही सांगण्यात आलं आहे. पायी जाणाऱ्या भाविकांसाठी पोलिसांकडून विशेष मार्गदर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे.