सोमवारी रात्री ८ वाजता पुण्याहून यवतमाळकडे निघालेली ही ट्रॅव्हल्स (MH 29 AW 4444) मंगळवारी पहाटे ३ च्या सुमारास छत्रपती संभाजीनगर जालना महामार्गावर बदनापूरजवळील सेलगाव येथे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. पण, भीमराव घोडे आणि सहचालक इर्शाद शेख यांच्या प्रसंगावधानामुळे आज २७ प्रवाशांचा जीव वाचला. त्यामुळे चालकाचं करावं तेवढं कौतुक कमी आहे.
२० मिनिटांचा तो 'डेथ वॉच'
advertisement
रात्री २:३० वाजता शेकटा येथे चहा-पानासाठी बस थांबली होती. २० मिनिटांच्या ब्रेकनंतर बस पुढे प्रवासाला निघाली. कुणी झोपण्याच्या तयारीत होतं, तर कुणी स्वप्नांच्या दुनियेत होतं. २० मिनिटांतच बस सेलगावजवळ आली आणि अचानक बसचं डाव्या बाजूचं टायर फुटलं. घर्षणामुळे आगीच्या ठिणग्या उडाल्या आणि टायरने पेट घेतला.
आम्ही ओरडलो, आपत्कालीन दरवाजे उघडले!
चालक भीमराव घोडे सांगतात, "टायर पेटल्याचं दिसताच मी आणि इर्शाद बसमध्ये धावलो. प्रवाशांना ओरडून सावध केलं. काही प्रवासी गाढ झोपेत होते, त्यांना अक्षरशः हलवून उठवलं. क्षणाचाही विलंब न लावता आपत्कालीन दरवाजे उघडले. लोक जीवाच्या आकांताने खाली उतरत होते. सर्व २७ प्रवासी सुखरूप खाली उतरले आहेत याची खात्री केल्यावरच आम्ही बाजूला झालो. प्रवाशांचं साहित्य देखील पटापट बाहेर काढायला सुरुवात केली. सगळे प्रवासी सुखरुप बाहेर उतरले, सगळ्यांनी डोळ्यादेखत बस जळून खाक होताना पाहिली, काळजाचा थरकाप उडवणारी ही घटना कोणीच विसरु शकणार नाही. बसचा केवळ सांगाडाच शिल्लक राहिला होता.
डोळ्यांसमोर खाक झालं सर्वस्व!
प्रवासी खाली उतरले आणि पुढच्या काहीच मिनिटांत आगीने रौद्ररूप धारण केलं. प्रवाशांच्या डोळ्यांसमोर त्यांचं सामान, स्वप्नं आणि प्रवासाचं साधन जळून खाक होत होतं. अंधाऱ्या रात्री त्या आगीच्या ज्वाळांमध्ये बसचा केवळ सांगाडा उरला. महिनाभरातील ही दुसरी घटना असल्याने महामार्गावरील प्रवासाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
