अजितदादा पवार यांनी बारामतीपासून राज्याच्या राजकारणापर्यंत दीर्घ आणि प्रभावी वाटचाल केली. सहा वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री, प्रशासनातील बारकावे, कामातील शिस्त आणि पहाटेपासून कामाला सुरुवात करण्याची त्यांची सवय यामुळे ते कार्यकर्त्यांमध्ये आणि अधिकाऱ्यांमध्येही परिचित होते. निर्णयक्षमतेमुळे आणि थेट बोलण्याच्या शैलीमुळे ते कायम चर्चेत राहिले.
advertisement
सहा दशकांहून अधिक काळ सार्वजनिक जीवनात सक्रिय असलेल्या अजितदादांनी सिंचन, कृषी, पायाभूत सुविधा आणि ग्रामीण विकास या क्षेत्रांमध्ये ठोस कामगिरी केली. त्यांच्या नेतृत्वाखाली बारामती परिसरात झालेली विकासकामे हे त्यांच्या कार्यशैलीचे जिवंत उदाहरण मानले जाते. कार्यकर्त्यांच्या हाकेला धावून जाणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती. पक्षांतर्गत राजकारण असो किंवा विरोधकांशी सामना, अजितदादांनी नेहमीच ठाम भूमिका घेतली.
अजितदादांचे पुण्यातील जिजाई बंगला निवासस्थान हे अनेक राजकीय घडामोडींचे साक्षीदार राहिले आहे. या ठिकाणीच अनेक महत्त्वाचे निर्णय, चर्चा आणि बैठका झाल्या आहेत. त्यांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली असल्याची भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे. प्रशासनावर असलेली त्यांची पकड, कामातील शिस्त आणि दिलेला शब्द पाळण्याची वृत्ती महाराष्ट्राच्या जनमानसात कायम स्मरणात राहील, असं अजित पवार यांचं नेतृत्व होतं.





