गंगापूर तालुक्यातील शिरेगाव येथे झालेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता सोमवारी भक्तिमय वातावरणात झाली. महंत लक्ष्मणदास बाबा बैरागी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आठवडाभर चाललेल्या या धार्मिक सोहळ्याचा समारोप पांडुरंग महाराज उगले बीडकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाला.
संध्याकाळी पारंपरिक पद्धतीने सप्ताहातील उरलेल्या वस्तूंचा लिलाव घेण्यात आला. यावेळी सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते केवळ दहा रुपयांच्या ‘भांडे घासणी’ने. भक्तिभावाने भरलेल्या लिलावात या घासणीची किंमत तब्बल ११ हजार रुपयांपर्यंत पोहोचली. गावातील बंडू अंबादास गोटे यांनी सर्वाधिक बोली लावत ती खरेदी केली.
advertisement
घासणी खरेदीसाठी गावकऱ्यांमध्ये चुरस निर्माण झाली होती. प्रत्येकाने एकमेकांवर वरचढ बोली लावत उत्साहाने सहभाग घेतला. अखेर बंडू गोटे यांनी लिलावात सर्वांना मागे टाकत ती विकत घेतली.
लिलावात इतर वस्तूंच्याही चांगल्या बोली लागल्या. साखरेचे 50 किलोचे सहा कट्टे प्रत्येकी 1700 ते 2200 रुपयांना विकले गेले. तर बेसन पीठ 10 किलोसाठी दोन किलोमागे 300 रुपये इतकी बोली लागली. तांदळाच्या 15 किलोच्या पोत्याची किंमत 750 रुपये मिळाली, तसेच ताडपत्रीचा लिलावही 750 रुपयांना झाला.