छत्रपती संभाजीनगर : 10 श्वानांचा अचानक मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे. शहरातील पहाडसिंगपुरा भागातील गुरु दत्तानगर भागात आज शुक्रवार दिनांक 31 रोजी सकाळी 11 वाजता ही घटना उघडकीस आली. खाद्यपदार्थात विषारी औषध टाकल्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
पहाडसिंगपुऱ्यातील गुरु दत्तानगर येथील रहिवासी उषा राजू घाटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, लॅब्रॉडॉग जातीचा इंग्लिश श्वान गेली सहा वर्षापासून पाळलेला होता. दरम्यान गुरुवार दिनांक 30 रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास घाटे कुटुंबीय मॉर्निंग वॉकसाठी निघाले. यावेळी बुजू नावाचा इंग्लिश श्वान घराच्या कंपाऊंडच्या बाहेर सोडला. यावेळी त्याने काही पदार्थ खाल्ले. थोड्यावेळाने घाटे कुटुंबाने श्वानाला घरात घेऊन ते कामानिमित्त बाहेर गेले.
शेतकऱ्यांनो गैरसोय टाळा, जालना कृषी उत्पन्न बाजार समिती शनिवारी राहणार बंद, कारण काय?
थोड्या वेळात श्वानाला उलट्या झाल्या. काही वेळाने ओळखीच्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार घरासमोरील झाडांमध्ये विषारी औषध लावून बिस्किट टाकलेले होते. कदाचित ते खाल्ल्याने उलट्या झाल्या असतील असे सांगितले. त्यानंतर श्वानाला तातडीने खडकेश्वर येथील जनावरांच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यासोबतच इतरही 9 भटके श्वान आहेत. त्यांचा देखील हे बिस्किट खाऊन मृत्यू झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी घाटे यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
मानवाला ज्याप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे त्याचप्रमाणे प्रत्येक जनावराला जगण्याचा अधिकार आहे. त्यामुळे कुणीही जनावरांना मारण्याचा प्रयत्न करू नये. असं कृत्य कुणी केल्यास बिएनएस 325 अंतर्गत चार ते सहा वर्षाची शिक्षा होऊ शकते, असं लाइफ केअर वेलफेअर संस्थाचे अध्यक्ष जय शिंदे यांनी सांगितलं.





