सुमारे हजार लोकसंख्या असलेल्या शेवता बुद्रुकमध्ये जिल्हा परिषदेची शाळा नाही. परिणामी गावातील सुमारे 45 विद्यार्थ्यांना दररोज नदीपलीकडील शेवता खुर्द येथील शाळेत जावे लागते. मात्र या दोन गावांना जोडणारा पूल नसल्याने हा प्रवास सुरक्षित न राहता जीवघेणा ठरतो. यंदा मे महिन्यापासून पावसामुळे गिरिजा नदीला आलेल्या पुरामुळे पात्र अजूनही वाहते आहे. शाळा सुरू झाल्यानंतर सुरुवातीचे दोन महिने अनेक मुलांना घराबाहेरही पडता आले नाही.
advertisement
सांगा जगायचं कसं? सव्वालाख खर्चून कांदा शेती, फक्त 8 हजार रुपये आले हाती, शेतकऱ्यानं हिशोबच मांडला
शिक्षण थांबू नये म्हणून अखेर पालकांनी धाडसी पण धोकादायक मार्ग स्वीकारला—थर्माकोलवर बसवून मुलांना नदी पार करून देण्याचा. काही दिवसांपूर्वी थर्माकोलचा तोल गेल्याने दोन विद्यार्थी थेट नदीत पडले. सुदैवाने ग्रामस्थांनी वेळीच मदत केली आणि मोठा अनर्थ टळला. मात्र, ही घटना केवळ इशारा ठरली; प्रशासन मात्र अजूनही हालचाल करताना दिसत नाही.
ग्रामपंचायतीने पुलासाठी वारंवार ठराव मंजूर करून पाठपुरावा केला आहे. जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागण्या करण्यात आल्या, तरीही प्रत्यक्ष काम सुरू झालेले नाही. कागदोपत्री प्रस्ताव पुढे सरकत असले, तरी नदीच्या प्रवाहासोबत विद्यार्थ्यांचे भविष्य अडकून पडले आहे.
एका बाजूला ‘डिजिटल इंडिया’ आणि ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’सारख्या घोषणा दिल्या जातात; दुसऱ्या बाजूला लहानग्या मुलींसह विद्यार्थी जीव मुठीत धरून नदी पार करतात. हा विरोधाभास केवळ घोषणांचा नव्हे, तर संवेदनशीलतेचाही आहे. शिक्षणाच्या वाटेवरचा हा धोका दूर करण्यासाठी केवळ आश्वासन नव्हे, तर तातडीची कृती आवश्यक आहे.
दरम्यान, संबंधित रस्ता जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असून नाबार्ड योजनेअंतर्गत नवीन पुलाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. मंजुरीनंतरच पुढील कार्यवाही होईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली आहे. तोपर्यंत मात्र शेवता बुद्रुकमधील पालक आणि विद्यार्थी दररोज धोक्याशी दोन हात करत शिक्षणाची कास धरून आहेत.






