बाबुसिंग सोबकचंद महेर (वय 45, रा. पेंडापूर, ह.मु. ढोरेगाव) हे त्यांची 13 वर्षांची मुलगी आचल बाबूसिंग महेर हिच्यासोबत चाळीसगाव येथील लग्नसमारंभासाठी दुचाकीवरून (एमएच 20, डी यु - 0541) निघाले होते. वडिलांनी हेल्मेटही परिधान केले होते. नियमांचे पालन करूनही नियतीने क्रूर खेळ खेळला. जिकठाण फाटा येथील ग्रीन-पॅक कंपनीजवळ विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या एका आयशर टेम्पोने (एम एच 20, सी टी-0843) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
advertisement
‘कल्पना भागवत’चा अफगाणी बॉयफ्रेंड 7 वर्षांपासून भारतात, चौकशीतून धक्कादायक कांड समोर
हा अपघात इतका भीषण होता की, बाबुसिंग महेर यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांची निष्पाप मुलगी आचल हिच्या डोळ्यांसमोरच वडिलांना अखेरचा श्वास घ्यावा लागला. तिच्यासाठी हा क्षण काळजाला चिरणारा आणि आयुष्यभरासाठी वेदना देणारा ठरला.
अपघाताची माहिती मिळताच भोसले अॅम्बुलन्सचे चालक शुभम वाघमारे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून महेर यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. काळजाचा धडका उडवणारी ही घटना 13 वर्षीय मुलीसमोर घडली. वडिलांनी हेल्मेट घातले असतानाही अपघाताची तीव्रता इतकी होती की त्यांचा जीव वाचू शकला नाही. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार डी. वाय. अवधूत यांच्या माहितीवरून वाळूज पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.






