केंद्र सरकारने या विमानतळाला 'छत्रपती संभाजीनगर विमानतळ' असे नाव देण्याचा निर्णय घेऊन त्यासंबंधीचे परिपत्रक काढले होते. परंतु, महाराष्ट्राच्या विधिमंडळाने मंजूर केलेल्या आणि नागरिकांच्या मागणीनुसार, विमानतळाला 'छत्रपती संभाजी महाराज विमानतळ' हे पूर्ण नाव देण्यावर जोर देण्यात आल्याने, भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (AAI) सद्यस्थितीत नामकरण प्रक्रिया थांबवली आहे.
advertisement
परिपत्रक तात्पुरते स्थगित
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय नागरी उड्डान मंत्रालयाने काढलेल्या परिपत्रकात 'महाराज' या महत्त्वाच्या शब्दाचा समावेश नसल्याने खासदार आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी आक्षेप घेतला. यामुळेच, जनतेच्या भावना आणि राज्याच्या मूळ प्रस्तावाचा आदर करत, हे परिपत्रक तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. 'छत्रपती संभाजी महाराज विमानतळ' असे नामकरण करणारे सुधारित आणि अंतिम परिपत्रक लवकरच केंद्र शासनाकडून निघण्याची शक्यता आहे.
“नागरी उड्डान मंत्रालयाने ‘छत्रपती संभाजीनगर विमानतळ’ असे नामकरण करण्याचे परिपत्रक काढले होते, पण ते थांबवले आहे. कारण आम्हाला ‘छत्रपती संभाजी महाराज विमानतळ’ हे पूर्ण नाव हवे आहे. आम्ही सातत्याने पाठपुरावा करत असून, तसे सुधारित परिपत्रक लवकरच जारी होईल,” असे डॉ. भागवत कराड म्हणाले आहेत.
शहराचे नाव 'औरंगाबाद' वरून 'छत्रपती संभाजीनगर' असे बदलल्यानंतर, आता रेल्वे स्थानकानंतर विमानतळाचे नामकरणही होत आहे. राज्याच्या मंत्रिमंडळाने मार्च 2020 मध्येच चिकलठाणा विमानतळाचे नाव 'छत्रपती संभाजी महाराज विमानतळ' असे करण्यास मंजुरी देऊन केंद्राकडे अंतिम मान्यतेसाठी पाठवले होते. हा प्रस्ताव केंद्र सरकारच्या नागरी उड्डयन मंत्रालयाकडे गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित आहे.
राज्यातील अनेक नेत्यांनी व राजकीय पक्षांनी देखील केंद्र सरकारकडे केवळ 'छत्रपती संभाजीनगर विमानतळ' नव्हे, तर 'महाराज' या सन्मानसूचक शब्दाचा समावेश करून 'छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ' असे नामकरण करावे, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, नामकरणानंतर विमानतळाला शहराच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाशी जोडणारा नवा दर्जा मिळेल. एअरलाईन्सच्या तिकीट आरक्षण प्रणालीमध्ये, नवीन फलकांवर, माहितीफलकांवर आणि वेबसाइटवर लवकरच हे नवे नाव दिसेल. सध्या 'छत्रपती संभाजी महाराज' या पूर्ण नावाच्या समावेशासाठी प्रक्रिया थांबवण्यात आल्यामुळे, आता सर्वांचे लक्ष केंद्र सरकारच्या सुधारित परिपत्रकाकडे लागले आहे, जे 'छत्रपती संभाजी महाराज विमानतळ' या नावाची अधिकृत घोषणा करेल.






