सावधान! अजिंठा परिसरात दहशत वाढली, 15 किमीच्या भागात भीतीचे वातावरण, काय घडतंय?
- Reported by:Ravi Shivaji Shikare
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Chhatrapati Sambhajinagar: वन विभागाने संवेदनशील ठिकाणी ट्रॅप कॅमेरे बसवले असून आपल्या पथकासह वनअधिकारी रात्री गस्त घालत आहेत.
छत्रपती संभाजीनगर : अजिंठा वनपरिक्षेत्रात गेल्या दीड महिन्यापासून बिबट्याचा वावर वाढल्याने ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अजिंठा, अनाड, बोदवड, सराटी, हळदा, पिंपळदरी मुखपाठ या परिसरात बिबट्याने आतापर्यंत सुमारे 15 जनावरांवर हल्ले करून त्यांचा फडशा पाडल्याची माहिती समोर आली आहे. दर दोन-तीन दिवसांत एखाद्या जनावरावर हल्ला होत असल्याने शेतकरी सतर्क झाले आहेत, मात्र वारंवार बिबट्याच्या जनावरांवर हल्ल्याच्या घटना घडत असल्याने 15 किलोमीटर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वन विभागाची गस्त
बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने संवेदनशील ठिकाणी ट्रॅप कॅमेरे बसवले असून वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष दोडके हे स्वतः आपल्या पथकासह रात्री गस्त घालत आहेत. काही दिवसांपूर्वी अजिंठा-अंधारी धरण परिसरात बिबट्या दिसल्याची चर्चा झाली होती. त्यानंतर नागझिरी भागातील अनाड शिवारात एका शेतकऱ्याच्या गोऱ्यावर बिबट्याने पहाटे हल्ला करून ठार केल्याची घटना घडली. या घटनेत शेतकऱ्याचे सुमारे 45 ते 50 हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. सततच्या घटनांमुळे शेतकरी पिंजरे लावण्याची ठाम मागणी करत आहेत.
advertisement
जनजागृतीची गरज, संवर्धन वर्षात चिंता वाढली
बिबट्याच्या भीतीमुळे अनेक शेतकरी रात्री शेतात जाणे टाळत असून या परिस्थितीचा फायदा घेत बिबट्या गुरांवर हल्ले करत असल्याचे चित्र आहे. वन विभागाने शेतकऱ्यांसाठी खबरदारीच्या उपायांबाबत जनजागृती मोहीम राबवावी, अन्यथा बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. विशेष म्हणजे युनोस्कोने 2026 हे वर्ष गाय, गुरे व दुभती जनावरांच्या संवर्धनासाठी घोषित केले असताना अशा घटनांमुळे संवर्धनाच्या उद्दिष्टांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याची प्रतिक्रिया जैवविविधता अभ्यासक डॉ. संतोष पाटील यांनी व्यक्त केली आहे.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Feb 02, 2026 10:48 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
सावधान! अजिंठा परिसरात दहशत वाढली, 15 किमीच्या भागात भीतीचे वातावरण, काय घडतंय?










