महेशनगर येथील डॉ. स्नेहकुमार सोमानी यांनी काही महिन्यांपूर्वी मनपाच्या उद्यान विभागाकडे झाड तोडण्यासाठी परवानगी मागितली होती. मात्र परवानगी नाकारल्यानंतरही त्यांनी बांधकामाला अडथळा ठरत असल्याचे कारण देत सोनमोहराचे झाड तोडल्याची तक्रार वृक्ष प्राधिकरणाकडे दाखल झाली. तपासासाठी सहायक उद्यान अधीक्षक नानासाहेब पठाडे यांनी स्थळ पाहणी केली असता झाडतोड झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे मनपाने संबंधित डॉक्टरवर दंडात्मक कारवाई केली.
advertisement
दरम्यान, सिडको एन-6 भागात असलेल्या एका प्रार्थनास्थळात सात अशोकाची झाडे तोडल्याचा प्रकारही समोर आला आहे. त्यांना नोटीस देऊन कारणे विचारण्यात आली असता, प्रार्थनास्थळाने चूक मान्य करून दहा नवीन झाडे लावल्याची माहिती दिली. तरीदेखील तीन लाखांचा दंड लावण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे महापालिकेने सांगितले.
सोनमोहर आणि अशोकासारखी झाडे केवळ शोभेची नाहीत, तर शहरातील हवेचा दर्जा सुधारून प्राणवायू देणारी आहेत. अशा झाडांची विनापरवाना तोड म्हणजे केवळ कायद्याचा भंग नव्हे, तर पर्यावरणाशी केलेला अन्याय आहे. त्यामुळे महापालिकेने घेतलेली ही कठोर कारवाई ही ‘हरित संभाजीनगर’ राखण्यासाठी एक जागरूक पाऊल मानले जात आहे.