मिळालेल्या माहितीनुसार, आडूळ बसस्थानकाजवळ शुभम उत्तमराव पिवळ यांचे ई-दुचाकी बॅटरी दुरुस्तीचे दुकान आहे. त्यांनी त्यांच्या इलेक्ट्रिक दुचाकीची (एमएच 04 एलएफ 7610) बॅटरी काढून दुपारी दोनच्या सुमारास चार्जिंगला लावली. दरम्यान, ते जेवणासाठी घरी गेल्याने दुकानात त्यांची चुलती मुक्ताबाई बसल्या होत्या. अवघ्या 15 मिनिटांत चार्जिंगला ठेवलेल्या बॅटरीचा जबरदस्त स्फोट झाला. यात मुक्ताबाई गंभीर भाजल्या होत्या.
advertisement
मुक्ताबाई यांना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. बुधवारी त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, सून व नातवंडे असा परिवार आहे.
दरम्यान, इलेक्ट्रिक वाहनांबाबत ही पहिली घटना नसून, मागील काही महिन्यांपासून अशा स्फोटांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. एप्रिल 2024 मध्ये छावणी भागात चार्जिंगला ठेवलेल्या ई-व्हेइकलमुळे आगीचा प्रसंग घडला. डिसेंबर 2024 मध्ये देखील उच्च न्यायालयासमोरील सिग्नलवर चालत्या ई-दुचाकीतून अचानक धूर निघाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले.
ई-बाईक चार्ज करताना घ्यायची काळजी
नेहमी कंपनीकडून दिलेल्या केबल आणि अडॉप्टरचाच वापर करावा.
रात्रभर चार्जिंग टाळावी; ओव्हरचार्जमुळे स्फोटाचा धोका वाढतो.
पॉवर एक्स्टेंशनऐवजी थेट प्लगवर चार्जिंग करावी.
चार्जिंग जागा हवेशीर आणि सुरक्षित ठेवावी.
पूर्ण चार्ज झाल्यानंतर बटन बंद करणे विसरू नये.
कंपनीचे सेफ्टी नॉर्म तपासूनच वाहन विकत घ्यावे.






