वडिलांच्या निधनानंतर घरातील सर्व जबाबदारी मनोजकडे होती. मोठा भाऊ गेल्यानंतर आईचा एकमेव आधार म्हणूनच तोच कुटुंबाला सावरत होता. मात्र शनिवारी सकाळी मनोजनेही राहत्या घरात गळफास घेतल्याची घटना उघडकीस येताच गावात शोककळा पसरली.
घटनेची माहिती मिळताच पिशोर पोलिस ठाण्याचे बीट जमादार वसंत पाटील, दत्तू लोखंडे व विजय भोटकर यांनी तातडीने धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह पिशोर ग्रामीण रुग्णालयात नेल्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत्यूची खात्री केली. डॉक्टर बनसोडे यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन केला.
advertisement
सोशल मीडियावर ग्लॅमर, मागे फसवणुकीचा खेळ, तरुणींना फसवणारा ठाण्याचा 'रील स्टार' अटकेत
शनिवार सकाळी शफेपूरच्या स्मशानभूमीत मनोजचा अंत्यसंस्कार करण्यात आला. अंत्यसंस्काराच्या वेळी आईच्या आक्रोशाने हृदय पिळवटून निघाले. वर्षभरात वडील आणि दोन्ही मुलांना गमावल्याने संसाराचा संपूर्ण आधारच हरपल्याचे चित्र उपस्थितांना असह्य झाले.
मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पिशोर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून सपोनि शिवाजी नागवे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार दत्तू लोखंडे व वसंत पाटील पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान, एकाच कुटुंबात झालेले सलग मृत्यू पाहून शफेपूर परिसरातील ग्रामस्थांत हळहळ व्यक्त होत आहे. आईसाठी दोन्ही मुलगेच जणू जीवनाचा आधार होते… आणि तो आधार क्षणार्धात हिरावून गेला. त्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.






