राधा हिचं माहेर सुंदरवाडी झाल्टा येथील आहे. तिचा विवाह पैठण तालुक्यातील नांदरच्या संतोष शेळके सोबत झाला होता. या दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी अशी जुळी मुलं आहेत. काही दिवस सुखाचा संसार सुरू होता. परंतु, त्यानंतर सासरच्या मंडळींनी पैशांसाठी छळ करायला सुरुवात केली. घर बांधण्यासाठी तुझ्या वडिलांकडून दोन लाख रुपये आण, असा तगादा सासरच्या लोकांनी लावला होता. वडिलांची परिस्थिती गरिबीची असल्याने वडील पैसे देऊ शकत नाही, असं राधानं सासरच्या मंडळींना वारंवार सांगितलं. परंतु, मागणी कायम होती.
advertisement
दरम्यान, 2022 पासून राधा हिची सासू कमलबाई शेळके, मोठा दीर राजेंद्र शेळके, जाऊ निकिता राजेंद्र शेळके, ननंद जनाबाई अमोल राठोड सर्व राहणार नारायणगाव, जिल्हा बीड यांनी पैशांसाठी राधाचा छळ केला, असं माहेरचे लोक सांगतात. या प्रकरणी राधाने माहेरी सांगितले होते. तेव्हा कुटुंबीयांनी तिची समजूत काढली. मात्र सततच्या त्रासाला ती कंटाळली होती. अखेर तिने टोकाचा निर्णय घेत शेततळ्यात उडी घेऊन आयुष्य संपवले.
कुटुबीयांचा संताप
माहेरच्या नागरिकांनी पैठण येथील शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. सासरच्या मंडळींनी मुलीचा छळ केल्यामुळे तिने आयुष्य संपवलं. जोपर्यंत आरोपींना अटक करत नाही तोपर्यंत शवविच्छेदन करणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. परिस्थिती पाहता पोलिसांनी अंत्यविधीसाठी बंदोबस्त लावत पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार पार पडले. याप्रकरणी पाचोड पोलिसांत सासरच्या व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.