अतिरक्तस्रावामुळे हर्षिनची प्रकृती झपाट्याने खालावली. उपचारात डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप करत संतप्त कुटुंबीयांनी शनिवारी दुपारी उस्मानपुरा पोलिस ठाण्यासमोर मृतदेह ठेवून तब्बल तीन तास ठिय्या आंदोलन केले. पोलिसांनी पतीची तक्रार स्वीकारून पारदर्शक चौकशीचे आश्वासन दिल्यानंतर तणाव निवळला.
advertisement
तक्रारीनुसार, शहा कॉलनी येथील खालेद चाऊस व हर्षिन या दाम्पत्याला आधीच एक मुलगी असून हर्षिन दुसऱ्यांदा गरोदर होती. 21 तारखेला सकाळी हर्षिनची प्रकृती अचानक बिघडल्याने खालेद यांनी तिला उस्मानपुऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी सिझेरियन शस्त्रक्रिया करून दुपारी 1:20 वाजता हर्षिनने मुलीला जन्म दिला. बाळाची प्रकृती नाजूक असल्याचे सांगून तिला इन्क्युबेटरमध्ये ठेवण्यात आले.
हर्षिनला त्याच दिवशी सायंकाळी 5:30 वाजता अचानक तीव्र रक्तस्राव सुरू झाला. परिस्थिती गंभीर झाल्यानंतर रात्री 8 वाजता डॉक्टरांनी डायलिसिसची आवश्यकता असल्याचे सांगत दुसऱ्या डॉक्टरांना बोलावले. मात्र, तासाभरातच कोणतीही पूर्वकल्पना न देता डॉक्टरांनी हर्षिनला सेव्हन हिल परिसरातील दुसऱ्या खासगी रुग्णालयात परस्पर दाखल केले. या रुग्णालयातही उपचारांबाबत कुटुंबीयांना कोणतीही ठोस माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे आईचा पहिला स्पर्श न मिळताच हर्षिनच्या नवजात बाळाला घरी न्यावे लागले, ही हृदयद्रावक परिस्थिती कुटुंबावर ओढवली.
शुक्रवारी दुपारी उपचार सुरू असतानाच हर्षिनचा मृत्यू झाला. अपार दुःखासोबतच डॉक्टरांच्या कथित निष्काळजीपणामुळे कुटुंबीयांचा संताप अनावर झाला. शनिवारी मृतदेह ताब्यात घेत कुटुंबीयांनी उस्मानपुरा पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. शेकडो नागरिकांनी डॉक्टरांविरोधात घोषणाबाजी करत गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली.
तणाव वाढताच उपायुक्त प्रशांत स्वामी, सहायक आयुक्त मनीष कल्याणकर आणि निरीक्षक संग्राम ताटे यांनी घटनास्थळी धाव घेत कुटुंबीयांशी चर्चा केली. पती खालेद चाऊस यांचा जबाब नोंदवून तक्रार स्वीकारण्यात आली. प्रकरणाची पारदर्शक चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी दिल्यानंतर कुटुंबीयांनी आंदोलन मागे घेतले.






