अंत्यविधीला हजेरी अन् काही वेळातच श्रद्धांजली! डॉक्टरसोबत भयंकर घडलं, छ. संभाजीनगर हळहळलं
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Chhatrapati Sambhajinagar: सकाळी पालोद येथे झालेल्या एका अंत्यविधी कार्यक्रमात डॉ. विश्वास यांनी उपस्थित राहून श्रद्धांजलीपर शब्द व्यक्त केले होते.
छत्रपती संभाजीनगर: भरधाव पिकअपने दुचाकीला दिलेल्या धडकेत एका डॉक्टरचा जागीच मृत्यू झाला. सिल्लोड शहरालगत डोंगरगाव फाट्यावर हा भीषण अपघात झाला. डॉ. विश्वास शेषराव पालोदकर (वय 48, रा. पालोद, ता. सिल्लोड) असे मृत डॉक्टरचे नाव आहे. मंगळवारी दुपारी पालोद येथून सिल्लोडकडे स्कूटीवरून जात असताना ही घटना घडली. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. विश्वास हे पालोद येथून काही कामानिमित्त सिल्लोडकडे त्यांच्या स्कूटी (क्र. एमएच 20 एफई 3284) वरून येत होते. दरम्यान, डोंगरगाव फाट्याजवळ सिल्लोडहून डोंगरगावकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या बोलेरो पिकअप (क्र. एमएच 48 बीएम 2956) ने त्यांच्या स्कूटीला जबर धडक दिली. धडक इतकी तीव्र होती की पिकअपने स्कूटीला तब्बल 100 फूट फरफटत नेले. या भीषण अपघातात डॉ. विश्वास यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
advertisement
घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शेषराव उदार यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा व पुढील कार्यवाही सुरू केली. या घटनेत अधिक वेदनादायक बाब म्हणजे, त्याच दिवशी सकाळी पालोद येथे झालेल्या एका अंत्यविधी कार्यक्रमात डॉ. विश्वास यांनी उपस्थित राहून श्रद्धांजलीपर शब्द व्यक्त केले होते. मात्र काही तासांतच दुपारी सिल्लोडकडे येत असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली. या घटनेमुळे पालोद गावात शोककळा पसरली आहे.
advertisement
डॉ. विश्वास पालोदकर हे नेहमी हेल्मेटचा वापर करत असत. मात्र मंगळवारी पालोदहून सिल्लोडकडे येताना त्यांनी हेल्मेट परिधान केले नव्हते, अशी माहिती समोर आली आहे. अपघातानंतर काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, त्यांनी हेल्मेट घातले असते तर कदाचित त्यांचा जीव वाचू शकला असता.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Mar 18, 2026 10:10 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
अंत्यविधीला हजेरी अन् काही वेळातच श्रद्धांजली! डॉक्टरसोबत भयंकर घडलं, छ. संभाजीनगर हळहळलं









