पुतण्या रुग्णालयात, काका भेटायला निघाला, वाटेतचं भयंकर घडलं, ‘ते’ दृश्य पाहून छ. संभाजीनगर हळहळलं!
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Chhatrapati Sambhajinagar: सिल्लोडमध्ये पोहोचल्यानंतर त्यांनी दुचाकी लोटत सिल्लोड बायपास रोडवरील भारत पेट्रोलियमसमोरून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला.
छत्रपती संभाजीनगर: नातेवाईकाला भेटण्यासाठी निघालेल्या तरुणाचा प्रवास अर्ध्यावरच थांबल्याची हृदयद्रावक घटना सिल्लोडमध्ये घडली. पुतण्याची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात जात असताना काकाचा अपघातात मृत्यू झाला. सोमवारी (दि. 16) दुपारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. अजिनाथ धोंडीराम फुले (वय 28, रा. पिंपळगाव पेठ, ता. सिल्लोड) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अजिनाथ यांच्या चुलत भावाच्या मुलावर सिल्लोडमधील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याला भेटण्यासाठी अजिनाथ सोमवारी दुपारी निघाले होते. सिल्लोडमध्ये पोहोचल्यानंतर त्यांनी दुचाकी लोटत सिल्लोड बायपास रोडवरील भारत पेट्रोलियमसमोरून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला.
मलकापूर डेपोची (एमएच-14 एमएच-1475) बस याच वेळी मलकापूरहून पुण्याकडे जात होती. भरधाव वेगातील या बसने अजिनाथ यांना जोरदार धडक दिली. धडकेनंतर ते सुमारे 100 फूट फरपटत गेल्याची माहिती आहे. या भीषण अपघातात काही क्षणांतच एका तरुणाचे आयुष्य संपुष्टात आले.
advertisement
घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. सायंकाळी 7 वाजता अत्यंत शोकाकुल वातावरणात अजिनाथ यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, चार वर्षांची मुलगी आणि भाऊ असा परिवार आहे. या प्रकरणाची नोंद सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
advertisement
सिल्लोड बायपास रोडवरील भारत पेट्रोलियमसमोरील परिसर अपघातप्रवण ठिकाण म्हणून ओळखला जात आहे. येथे वारंवार अपघात घडत असल्याची स्थानिकांची तक्रार आहे. वाहनांचा वेग नियंत्रणात ठेवण्यासाठी स्पीडब्रेकर किंवा गतिरोधक नसल्याने धोका वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
जर या ठिकाणी योग्य उपाययोजना केल्या असत्या, तर अजिनाथ यांचा जीव वाचला असता, अशी भावना व्यक्त केली जात आहे. तसेच इशारा फलक, झेब्रा क्रॉसिंग आणि रिफ्लेक्टर बसविण्याचीही मागणी नागरिकांकडून होत आहे. प्रशासनाने तातडीने पाहणी करून आवश्यक पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Mar 17, 2026 11:59 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
पुतण्या रुग्णालयात, काका भेटायला निघाला, वाटेतचं भयंकर घडलं, ‘ते’ दृश्य पाहून छ. संभाजीनगर हळहळलं!







