छत्रपती संभाजीनगरमध्ये 4 डिसेंबर रोजी घडलेली एक घटना तर थरकाप उडवणारी ठरली. सातारा परिसरातून आई-वडिलांसोबत खंडोबाच्या दर्शनासाठी दुचाकीवरून निघालेल्या तीन वर्षांच्या बालकाचा गळा नायलॉन मांजाने चिरला. हर्मूल येथील स्वरांश संजीव जाधव हा चिमुकला पुढे बसला असताना सेंट्रल नाका येथे अचानक मांजा रस्त्यात आडवा आला. वडिलांनी बाजूला सारण्याचा प्रयत्न केला, तरी एका क्षणात मांजा स्वरांशच्या गळ्यात घुसला आणि जोरदार रक्तस्राव सुरू झाला.
advertisement
शेतात लपवलं असं काही..., रात्री पोलीस येताच जमावाने फेकले दगड, छत्रपती संभाजीनगरात खळबळ
तातडीने एमजीएम रुग्णालयात नेऊन शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्टरांच्या माहितीनुसार जखम 2 सें.मी. खोल आणि 6 सें.मी. लांब होती. 20 हून अधिक टाके घालावे लागले असून स्वरांशला आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. स्वरांशचे वडील संजीव जाधव यांनी सांगितले, “नायलॉन मांजावर बंदी असूनही हा मांजा खुलेआम दिसतो. माझ्या मुलासोबत जे घडलं, ते इतर कुणावरही येऊ नये. प्रशासनाने कठोर कारवाई करावी.”
गतवर्षी आणि यावर्षी नोंदलेल्या गंभीर घटना
21 डिसेंबर 2024 मध्ये कामावर जात असताना शहानूरमियाँ दर्गाजवळ एका इलेक्ट्रिशियन तरुणाचा गळा नायलॉन मांजाने सुमारे 10 सें.मी. लांब चिरला.
3 जानेवारी 2025 मध्ये न्यू पहाडसिंगपुरा परिसरात घाटी रुग्णालयातील वरिष्ठ अधिपरिचारिकेचा गळा मांजाने कापला.
5 जानेवारी 2025 मध्ये मोंढा नाका भागात 49 वर्षीय महिलेला गंभीर दुखापत झाली. जवळपास 4 तास शस्त्रक्रिया चालली आणि 40 टाके घालण्यात आले.
6 जानेवारी 2025 मध्ये टीव्ही सेंटर चौकात 19 वर्षीय तरुणाच्या गळ्यापासून मानेपर्यंतचा भाग कापला गेला. 35 टाके घालणे आवश्यक ठरले.
संक्रांतीला अजून वेळ आहे आणि नायलॉन मांजा बंदी असताना देखील कसा विकला जातो यावर कठोर कारवाई करावी, असे नागरिकांचे मत आहे.






