केंद्र सरकारच्या आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने जुलै 2025 मध्ये रेल्वे मंत्रालयाच्या सुमारे 11,169 कोटी रुपयांच्या चार प्रकल्पांना मंजुरी दिली होती. त्यामध्ये या दुहेरीकरण प्रकल्पाचाही समावेश करण्यात आला होता. त्यामुळे अनेक वर्षांची प्रतीक्षा संपुष्टात आली. हा प्रकल्प ‘इंजिनिअरिंग, प्रोक्योरमेंट अँड कन्स्ट्रक्शन’ (EPC) पद्धतीने राबविण्यात येणार असून कामाची गुणवत्ता आणि वेळेत पूर्णता यावर विशेष भर दिला जाणार आहे.
advertisement
या संपूर्ण प्रकल्पात 21 स्थानके, 28 मोठे पूल, 161 छोटे पूल आणि 29 भुयारी मार्गांचा समावेश आहे. दुहेरीकरणामुळे रेल्वे वाहतुकीची क्षमता वाढणार असून गाड्यांना क्रॉसिंगसाठी थांबण्याची गरज कमी होईल. परिणामी प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. तसेच मालवाहतुकीलाही मोठा फायदा होणार असून दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर (DMIC) अंतर्गत संभाजीनगर परिसरातील उद्योगांना चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पहिल्या टप्प्यातील छत्रपती संभाजीनगर ते गेवराई हॉल्ट या मार्गासाठी सुमारे 410.69 कोटी रुपयांची निविदा दक्षिण मध्य रेल्वेकडून जाहीर करण्यात आली आहे. या कामात रेल्वेमार्गाचे दुहेरीकरणासोबतच संपूर्ण मार्गाचे विद्युतीकरण, सिग्नलिंग प्रणालीतील सुधारणा आणि विद्यमान यंत्रणेत आवश्यक वाढीव सुविधा उभारण्याचा समावेश आहे.
दरम्यान, या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जमिनीच्या भूसंपादनाची प्रक्रिया देखील सुरू असून यापूर्वी त्यासंबंधी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. सुमारे 2,179 कोटी रुपये खर्चाच्या या 177 किमी लांबीच्या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी 2022 हे मूळ लक्ष्य ठेवण्यात आले होते. आता निविदा प्रक्रियेला सुरुवात झाल्याने प्रत्यक्ष कामाला वेग येण्याची अपेक्षा आहे.






